माजी क्रिकेटपटू युवराज सिंहच्या आईकडे 40 लाखांच्या खंडणीची मागणी, आरोपी महिला अटकेत

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगच्या आईकडून 40 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला युवराजची आई शबनम सिंग हिला सतत धमकावत 40 लाख रुपयांची मागणी करत होती. पाच लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी या महिलेला रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी आरोपी महिलेला युवराज सिंगच्या भावाच्या येथे केअरटेकर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, ती तिचे काम नीट करू शकत नसल्याचे कुटुंबीयांना वाटल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर महिलेने युवराजच्या आईची बदनामी करून तिला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. 40 लाख रुपये न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवून बदनामी करू, असे ती म्हणायची.

हेमा कोशिक उर्फ ​​डिम्पी असे या आरोपी महिलेचे नाव आहे. युवराजचा धाकटा भाऊ जोरावर सिंग डिप्रेशनच्या समस्येने त्रस्त आहे. हेमा यांना त्याच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, तिला 20 दिवसांतच नोकरीवरून काढून टाकण्यात आले. युवराजची आई शबनम सिंग यांनी धमक्या मिळाल्यानंतर डीएलएफ फेज-1 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. हेमाचे वागणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेमा जोरावरला अडकवण्याचा कट रचत असल्याचे शबनम सिंह यांनी तक्रारीत म्हटले होते. तिची कृती तिला संशयास्पद वाटली. शबनम म्हणाल्या की, मे महिन्यात हेमाने फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली आणि 40 लाख रुपयांची मागणी केली. तिने 19 जुलै रोजी मेसेज करून पैसे लवकर न मिळाल्यास 23 जुलै रोजी पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करू, असे सांगितले. यानंतर शबनम सिंह यांनी सोमवारपर्यंत पैशांची व्यवस्था करू असे सांगितले.

शबनम सिंगकडून पाच लाख घेण्यासाठी आलेल्या महिलेला गुरुग्राम पोलिसांनी रंगेहात अटक केली. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी हेमा कौशिकविरुद्ध भादंवि कलम 384 अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.