वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील फुले, फळांचे प्रदर्शन रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या वतीने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात दरवर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये भरवण्यात येणारे फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. मुंबईत महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये महापालिकेच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात फुले, फळे व भाज्या, झाडे किंवा रोपे यांचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शन जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवण्यात येते. प्रदर्शनाचा कालावधी तीन दिवसांचा असतो. या तीन दिवसांत अंदाजे दोन ते तीन लाख नागरिक व शाळकरी मुले या प्रदर्शनाला भेट देतात. त्यासोबत प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवर तसेच नामांकित मंडळीदेखील आवर्जून भेट देतात.