
कारागृहात असलेल्या एका सराईताने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांचा खून करण्यासाठी त्याने काही माणसेही नगरसेवकाच्या घराजवळ पाठवली होती.
मात्र, नगरसेवकाच्या पत्नीने दाराजवळ आलेल्या गुंडाना हटकल्यामुळे कट उधळला आहे. याप्रकरणी बाणेरमधील एका नगरसेवकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सध्या येरवडा कारागृहात असलेला अनिल यशवंते आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून बाणेरमधील वीरभद्रनगरमध्ये कुटुंबीयासोबत राहायला आहेत. 23 डिसेंबरला रात्री पावणेनऊच्या सुमारास एका व्यक्तीने नगरसेवकाच्या मुलाला फोन करून तुझ्या वडिलांवर खुनी हल्ला करण्यासाठी काही व्यक्ती बाहेर परिसरात आले असल्याची माहिती दिली. कारागृहात असलेला सराईत अनिल यशवंते याने ही माणसे पाठवल्याचे संबंधिताने नगरसेवकाच्या मुलाला सांगितले.
त्याचवेळी नगरसेवकाची पत्नी घराचे गेट लावत असताना त्यांच्या मोटार उभी असल्याचे दिसले. त्यामध्ये दोघेजण बसलेले पाहून पत्नीने तुम्हाला कोण पाहिजे असे विचारले. त्यामुळे मोटारीत बसलेल्या गुंडानी मोटार मागे घेत पळ काढला. त्यानंतर नगरसेवकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नगरसेवकाच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर हल्ला होणार असल्याचा तपास केला जात आहे. संबंधित संशयित आरोपीला न्यायालयाच्या परवानगीनुसार कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे. – दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे




























































