फेसबुकला मिळणार अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची ‘पॉवर’

फेसबुकला आता अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची ‘पॉवर’ मिळणार आहे. हिंदुस्थानातील आपल्या कार्यालयांबरोबरच सर्व्हरला आवश्यक असलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी फेसबुकने 32 मेगावॅट सौर ऊर्जेच्या खरेदीसाठी मुंबईस्थित क्लिनमॅक्स कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल कंपनीप्रमाणे आता फेसबुकही शंभर टक्के ग्रीन एनर्जी वापरणारी कंपनी ठरणार आहे.

वीजनिर्मिती करताना जाळाव्या लागणाऱया कोळशामुळे मोठय़ा प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते. त्याची दखल घेत जगभरात सुरू असलेल्या शून्य कार्बन उत्सर्जन मोहिमेला हातभार लावण्यासाठी फेसबुकने शंभर टक्के अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून तयार होणारी वीज वापरण्याबाबतची घोषणा केली होती.

त्यानुसार फेसबुकने आपली दैनंदिन विजेची गरज भागवण्यासाठी क्लिनमॅक्स या सौरऊर्जा निर्मिती करणाऱया वीज कंपनीसोबत करार केला आहे. क्लिनमॅक्सचा कर्नाटकमध्ये 32 मेगावॅटचा सौर प्रकल्प असून त्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे फेसबुकच्या रिन्यएबल एनर्जी हेड उर्वी पारेख यांनी स्पष्ट केले आहे. सदर वीज प्रकल्प कर्नाटकमध्ये असला तरी तेथे तयार होणारी वीज फेसबुकला सेंट्रल ग्रीडच्या माध्यमातून देशात कुठेही उपलब्ध होऊ शकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या