पंपासाठी विजेचे कनेक्शन देण्यास ‘महावितरण’ची टाळाटाळ, शेतकर्‍याची हायकोर्टात याचिका

25

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेतातील पंपासाठी विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून दोन वर्षांपासून ‘महावितरण’ कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही वीज देण्यास महावितरण टाळाटाळ करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे भरले तरी वीज मिळत नाही म्हणून कोल्हापुरातील अल्पभूधारक असलेल्या शेतकर्‍याने हायकोर्टात धाव घेतली असून महावितरणविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 23 जुलैला न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

कोल्हापुरातल्या सोनाळी येथील पांडुरंग म्हातुकडे यांची कोरडवाहू जमीन असून त्या ठिकाणी बागायती उत्पन्न घेता यावे म्हणून त्यांनी भूखंडालगत बोअरवेल खणली आहे. या बोअरवेलचे पाणी पंपाद्वारे काढता यावे यासाठी मुरगुड येथील महावितरण कार्यालयाकडे वीजपुरवठय़ासाठी अर्ज केला होता. त्यानुसार सुमारे सहा हजार रुपये आगाऊ रक्कम महावितरणच्या कार्यालयात भरले होते, मात्र दोन वर्षे उलटून गेली तरीही महावितरणने विजेचे कनेक्शन दिले नाही. या प्रकरणी महावितरणकडे तक्रार करूनही त्याचा काहीच उपयोग न झाल्याने अखेर शेवटचा पर्याय म्हणून मुंबई उच्च न्यायालयात ऍड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या