
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या मुंबई येथील घरासमोर पंढरपुरातील शेतकरी रणजित बागल यांनी सोमवारी अनोखे आंदोलन केले. ‘सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?’ अशा आशयांचे फलक हातात घेऊन आंदोलन केले.
शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. हे आंदोलन थोपण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाच्या कलाकारांनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने केंद्र शासनावर टीका करण्यास सुरूवात केली. यानंतर तेंडुलकर व इतर सेलिब्रिटींनी ट्विटरच्या माध्यमातून ‘इंडिया अगेंस्ट प्रोपोगंडा’ असा हॅशटॅग सिरीज सुरू केली.
यानंतर सर्वच स्तरातून तेंडुलकर यांच्यावर टीका होण्यास सुरूवात झाली. तेंडुलकर यांच्या एका ट्विटमुळे एकप्रकारे शेतकरी आंदोलनास विरोध केला, असा एक संदेश गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे अस्वस्थ झालेले शेतकरी तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी सोमवारी सकाळी तेंडुलकर यांचे मुंबई येथील निवासस्थान गाठले.
बागल यांनी तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करीत फलक दाखवला ‘सचिनजी माझ्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला.
यानिमित्ताने बागल म्हणाल , सचिन तेंडुलकर यांनी मैदानात धावांचा पाउस पाडला. तसा शेतकरी हा घाम मातीत गाळून मोत्यांसारखे धान्य पिकवतो. यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तेंडुलकर यांनी एकदा तरी ट्वीट करा, अशी विनंती यानिमित्ताने शेतक-यांच्या वतीने केली आहे. तसेच लवकरच सचिन तेंडुलकर याची दखल घेतील अशी अपेक्षा बागल यांनी व्यक्त केली.






























































