
देशभरातील शेतकऱ्यांना जाचक ठरतील असे तीन अध्यादेश नुकतेच केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. या अध्यादेशांना विरोध करण्यासाठी गुरुवारी हजारो शेतकऱ्यांनी हरयाणाच्या कुरुक्षेत्रावर उतरत शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध केला. भारतीय किसान संघ आणि अन्य शेतकरी संघटनांनी आयोजित केलेल्या या आंदोलनामुळे पिपली राष्ट्रीय महामार्ग बराच काळ ठप्प झाला होता. अखेर निदर्शक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा किसान महासंघाने केला आहे.
देशातील शेतकऱ्यांनी आपल्या हिताला जाचक ठरतील अशा केंद्राच्या तीन अध्यादेशांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. केंद्राने बाजार समित्या आणि कृषिमाल खरेदीबाबत मंजूर केले अध्यादेश सामान्य शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणार आहेत असे भारतीय किसान महासंघाचे म्हणणे आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकरी गुरुवारी मोठय़ा संख्येने कुरुक्षेत्रावर जमले होते.या शेतकऱ्यांनी केंद्रकिरोधात जोरदार नारेबाजी केली आणि पिपली राष्ट्रीय महामार्ग 44 कर ठाण मांडले. त्यातील काही निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलीस आणि निदर्शक शेतकऱ्यांत बाचाबाची झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला अशी माहिती कुरुक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक आस्था मोदी यांनी दिली.
कोणत्या अध्यादेशांना शेतकऱ्यांचा विरोध
केंद्र सरकारने आता व्यापारी मंडईच्या बाहेरही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कृषी माल विकत घेण्यास परवानगी दिली आहे. पूर्वी मंडईतूनच व्यापाऱ्यांना ही खरेदी करता येत होती. दुसऱ्या अध्यादेशाने सरकारने डाळी, बटाटे, कांदे धान्य आणि खाद्यतेलांना जीवनावश्यक वस्तू नियमातून बाहेर काढले आहे. शिवाय या कृषी मालाच्या साठेबाजीचीही मर्यादा उठवली आहे. या कायद्यांसह तिसऱ्या अध्यादेशात कंत्राटी शेतीला समर्थन देण्याचे धोरण अंमलात आणण्याच्या नीतीवर काम सुरु केले आहे. हे तिन्ही कायदे देशातील बळीराजाच्या हिताला बाधक असल्याचे भारतीय किसान संघाचे म्हणणे आहे. या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठीच शेतकऱ्यांनी कुरुक्षेत्रावर केंद्राविरोधात एल्गार छेडला होता.






























































