
देशात कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्य़ांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये या आंदोलनाला तीव्र धार चढली आहे. हरियाणातील रोहतकमध्ये कृषी कायद्याला विरोध करणाऱ्य़ा आंदोलनकर्त्यांनी काही भाजप नेत्यांना ओलीस ठेवले होते. त्यात माजी सहकार राज्यमंत्री मनीष ग्रोवर यांचाही समावेश होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौऱ्य़ावर होते. तेव्हा राज्यातील प्रत्येक शिव मंदिरात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्य़ाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखवले जात होते. तेव्हा रोहतक जिल्ह्यातील किलोई गावातील एका शिवमंदिरातही या कार्यक्रमाचे प्रसारण दाखवले जाणार होते. तेव्हा मनीष ग्रोवर आणि इतर भाजप नेते या मंदिरात पोहोचले होते. तेव्हा कृषी कायद्याला विरोध करणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांनी या नेत्यांना ओलीस ठेवले. भाजप नेत्यांना ओलीस ठेवल्यानंतर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मनीष ग्रोवर, संघटना मंत्री, रविंद्र राजू, महापौर मनमोहन गोयल, जिल्हा अध्यक्ष अजय बन्सल, सतीश नांदल, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामअवतार वाल्मिकी, उपमाहापौर राजकमल सहगल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष उषा शर्मा, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवील ढुल सहने भाजपचे नगरसेवक आणि अनेक नेते उपस्थित होते.
अनेक आंदोलनकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या गाडीच्या चाकांची हवा काढली. तर मंदिरात लावलेल्या टीव्हीच्या वायर्सही कापल्या गेल्या. भाजप नेत्यांना मंदिर परिसरात बंद करण्यासाठी प्रवेशद्वारावर दगड आणि झाडाच्या फांद्या ठेवण्यात आल्या होता. वेळीच पोलिसांनी धाव घेतली आणि आंदोलक शेतकऱ्य़ांची समजूत काढण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांची शिष्टाई कामी आली आणि शेतकऱ्य़ांनी भाजप नेत्यांची सुटका केली.




























































