शिराळा, वाळवा तालुका वगळता सांगलीत पावसाची दडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळवा तालुका वगळता पावसाने पुन्हा दडी मारली. आकाशात ढगांची गर्दी असली तरी पाऊस नाही, अशी स्थिती सध्या जिल्ह्यात झाली आहे. मिरज, पलूस आणि कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात रिमझिम पाऊस अधूनमधून होत असला तरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत जिल्हा आहे. पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि आटपाडी तालुक्यात पावसाने ओढ दिली. कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे.

यंदा हवामान विभागाचा अंदाज चुकवत पावसाने दडी मारली होती. अखंड जून महिना कोरडा गेला. सुरुवातीला काहीसा पाऊस झाला होता; परंतु त्यानंतर पावसाची उसंत राहिली. चार दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली होती, मात्र सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. मंगळवार सकाळपासून ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू राहिला. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज तालुक्यांतील चांगल्या पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यात आज चोवीस तासांत 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दोन लाख हेक्टरवर पेरण्या बाकी
जिल्ह्यात अद्यापही दोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून आहे. याशिवाय जिथे पेरण्या झाल्या आहेत, त्याठिकाणी पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.