मिंधे सरकारचे थोबाड फुटले, पीकविम्याचे 52 रुपये नेण्यासाठी शेतकऱ्यांनी आणली तिजोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या माऱयामुळे तब्बल 1 लाख हेक्टरवरील शेती नेस्तनाबूत झाली. कापूस, तूर, सोयाबिन, गहू, ज्वारी, द्राक्ष, कलिंगड, कांदा आणि मक्याची पिके मातीत गेली. इतके प्रचंड नुकसान झालेले असताना दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱयांना 35, 52 आणि 90 रुपये नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. त्यामुळे शेतकऱयांच्या संतापाचा कडेलोट झाला असून आज यवतमाळमध्ये शेतकऱयांनी पीक विम्याची रक्कम नेण्यासाठी चक्क तिजोरी आणली. इतकेच नाही तर विम्याच्या रकमेसाठी पोलिसांकडून सशस्त्र संरक्षणही मागितले. शेतकऱयांच्या या अनोख्या आंदोलनामुळे मिंधे सरकारचे मात्र थोबाड फुटले.

या आंदोलनाने केवळ यवतमाळकरांचेच नाही तर संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतले. तिजोरी आणि सजवलेल्या बैलगाडीसह शेतकरी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले आणि विम्याच्या रकमेसाठी किमान सहा पोलिसांचे सशस्त्र संरक्षण देण्याची मागणी केली. शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिह्यातील 8 लाख 44 हजार शेतकऱयांनी 509 कोटींचा विमा हप्ता भरला. त्यापोटी विमा कंपनीने शेतकऱयांना तीन हजार 177 कोटी रुपये नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात 59 हजार शेतकऱयांना 41 कोटी 10 लाख रुपयेच मिळाले. जवळपास आठ लाख शेतकरी विम्याच्या नुकसानभरपाईपासून वंचित असून सरकारने एक रुपयांचा पीक विमा दिला की भीक दिली, असा सवाल शेतकरी नेते देवानंद पवार यांनी उपस्थित केला. आंदोलनात मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

काय काय करणार विम्याच्या पैशांत?

– सीबीलच्या अटीमुळे बँकेचे पीककर्ज न मिळाल्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज पीक विम्याच्या पैशांतून सर्वप्रथम फेडीन

– उभ्या पिकांची नासाडी करणाऱया जंगली प्राण्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करीन.

– तब्येत बरी नसतानाही शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱया बायकोला दवाखान्यात नेईन.

– अनेक महिन्यांपासून फाटक्या पँटीत शाळेत जाणाऱया पोराला कपडे घेईन.

– वयात आलेल्या मुलीचे धूमधडाक्यात लग्न करीन आणि संपूर्ण कुटुंबासह एकदा गुवाहाटीला पर्यटनासाठी जाईन.

– संकटग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या आयुष्यात भरभराटी आणणाऱया देशी-विदेशी महागडय़ा गाडय़ांच्या प्रदर्शनासाठी पालकमंत्री संजय राठोड यांना भरीव आर्थिक देईन आणि उरलीसुरली रक्कम तिजोरीत सांभाळून ठेवीन, असे अर्जात म्हटले आहे.

कापूस आणि सोयाबीन या पिकाकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला 52 रुपये 99 पैसे इतक्या रक्कमेचा भरीव पीकविमा मंजूर केला. त्यामुळे मी खुश झालो. बँकेतून ही रक्कम पिशवी किंवा सुटकेसमधून नेणे मला शक्य नसल्याने मी वडिलोपार्जित तिजोरी आणली. रुपये 52.99 इतक्या मोठय़ा रक्कमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेताना रस्त्यात लुटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही 50 खोक्यांपेक्षा मोठी रक्कम!

पोलिसांकडे तिजोरीच्या सुरक्षेसाठी शेतकऱयांनी अर्जच केला. मिळालेली रक्कम माझ्यासारख्या गरीब शेतकऱयांसाठी 50 खोक्यांपेक्षा मोठी असल्याने या रकमेच्या सुरक्षेची मला फारच काळजी लागली आहे. साऱया जगाची व चोरटय़ांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये 52.99 कडे लागली आहे. ही रक्कम तिजोरीत ठेवून बैलगाडीने न्यायची आहे. लुटमारीचा धोका लक्षात घेऊन त्यासाठी पोलीस संरक्षण द्या, अशा उपरोधिक शब्दांत शेतकऱयांनी सरकारच्या डोळय़ात झणझणीत अंजन घातले