
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
यंदा पावसाळा आलाच नाही. सलग तीन महिने झाले पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळाने कोरडेपणाचे व्रत घेतल्याने सोने पिकवणाऱया जमिनी वांझ झाल्या. दुष्काळाच्या वणव्यात मराठवाडा होरपळून निघत आहे. पाणवठे सुकले, उमदी जनावरे खाटकाच्या दावणीला जात आहेत. विद्यार्थ्याच्या पाठीवरचे दफ्तर गेले अन् डोक्यावर हंडा आला आहे. संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये अतिशय भयंकर परिस्थिती असून कामाच्या शोधात मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. काळय़ा आईच्या जिवावर मालक म्हणून रुबाब मिरवणाऱया शेतमालकाचा दुष्काळाने मजूर करून टाकला आहे.
मराठवाडा, अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणारा प्रदेश. पडला पाऊस तर धो धो नाही तर थेंबही पडणार नाही. त्यामुळे दुष्काळ हा मराठवाडय़ाच्या प्राक्तनाचाच भाग. जूनमध्ये हजेरी लावून गायब झालेला पाऊस थेट ऑगस्टमध्ये परतला. पावसाची नक्षत्रे वांझोटी गेली. हवामान खात्याने मोठा गाजावाजा करून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे भाकित केले. भेंडवळाच्या मांडणीनेही चांगल्या पावसाची भविष्यवाणी केली. पण सगळय़ांना पावसाने खोटे ठरवले. खरिपाची पेरणी वाया गेली. दुबार पेरणी करूनही उपयोग झाला नाही.
मालक मजुरीवर आला, मजुरांचे स्थलांतर
संभाजीनगर, बीड व जालना या तीन जिल्हय़ांत दुष्काळी परिस्थिती भयंकर आहे.एकही गाव असे नाही जिथे दुष्काळाने हातपाय पसरले नाहीत. गावागावात दुष्काळी आक्रोश सुरू आहे. प्यायला पाणी नाही, खायला दाणा नाही… अशी परिस्थिती आहे. सोयाबीन, मका, तूर, मूग, भुईमूग कोणतेच पीक हाती लागले नाही. जगायचे कसे अन् कर्ज फेडायचे कसे अशा चिंतांचे ओझे डोक्यावर घेऊन कुटुंबेच्या कुटुंबे शहराकडे पोटाची खळगी भरण्यासाठी धाव घेत आहेत. शेतमालकावर मजूरी करण्याची वेळ आली आहे.
आत्महत्यांचा प्रदेश होईल
विदर्भानंतर मराठवाडय़ात शेतकऱयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. बँकांचे तगादे, सातत्याने पडणारा दुष्काळ यामुळे मराठवाडय़ात शेतकऱयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सरकार दरबारी शेतकऱयांच्या प्रश्नांबद्दल असणारी अनास्था, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकऱयांची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे. बळीराजा म्हणून रुबाबाने मिरवणारा शेतकऱयांवर दुष्काळाने दारोदार फिरण्याची वेळ आणली आहे. हाताला काम आणि पोटाला अन्न अशी तजवीज सरकारने केली नाही तर हा मराठवाडा आत्महत्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जाईल.





























































