नापिकी, मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत, कर्जाच्या बोजाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

35

सामना प्रतिनिधी । कंधार

कंधार तालुक्यातील इमामवाडी गावातील रामराव व्यंकटी जंगवाड (४२) या शेतकऱ्याने महेंद्रा फायनान्स, बचत गटाच्या कर्जाला कंटाळून व शेतीत सतत नापिकी होत असल्याने तसेच मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यामुळे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सतत होणारी नापीकी त्यातच तालुका डोंगराळ असल्याने कंधारमधील शेतकरी पूर्णपणे वैतागला आहे. इमामवाडी येथील रामराव जंगवाड हे आपले भाऊ बाबूराव व्यंकटी जंगवाड यांच्या नावे असलेली शेती करत होते. गेल्या दोन चार वर्षापासुन शेतीत होणारे सततचे नुकसान त्यातच त्यांनी महेंद्रा फायनान्सचे ८० हजार रूपयांचे खासगी कर्ज घेतले होते. बचत गटाचेही त्यांच्यावर कर्ज होते. या सर्व कर्जाच्या परत फेडीतून जगणे सुसह्य होत नव्हते. त्यातच मुलगी लग्नाला आली असल्याने लग्नासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यांपासून नातेवाईकांसमोर बोलतांना मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे निराशाजनक उदगार ते सतत काढत होते.

दिनांक २७ रोजी रात्री अकराच्या सुमारास भाऊ बाबूराव जंगवाड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी शव कंधार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

आपली प्रतिक्रिया द्या