
सामना प्रतिनिधी । मुखेड
बँकेचे कर्ज माफ न झाल्याने व सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर उभा राहीलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन शेतात आत्महत्या केली. ही घटना मुखेड तालुक्यातील कबनूर तांडा येथे मंगळवारी दि. २६ रोजी दुपारी दोन वाजता घडली.
मुखेड तालुक्यातील कबनूर ग्राम पंचायती अंतर्गत कबनूर तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष रामू राठोड (५५) यांची दिड एकर शेती आहे. ते शेतीवर व मजुरी करुन आपला संसाराचा गाडा हाकत. पण गत तीन वर्षापासून सतत दुष्काळ पडत असल्याने शेतीत उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत होती. त्यातच राठोड यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाऱ्हाळी शाखेतून पीककर्ज उचलले होते. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ केल्याची घोषणा केली. परंतु ती घोषणा फसवी निघाली. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ झालेच नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा होता. कर्जाचा डोंगर व संसाराचा गाडा कसा हाकावा या विवंचनेतून सुभाष राठोड या शेतकऱ्याने मंगळवारी स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असून, या प्रकरणी महसूल प्रशासनाने व पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेन केले. आमदार तुषार राठोड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर, उद्योजक बालाजी पाटील कार्लेकर, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर यांनी सुभाष राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान सुभाष राठोड यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार तुषार राठोड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर, उद्योजक बालाजी पाटील कार्लेकर यांनी केली आहे.































































