किटकनाशकांची ड्रोनद्वारे फवारणी; मोर्शीमध्ये प्रात्यक्षिक

40

सामना प्रतिनिधी । अमरावती

कपाशीवर येणाऱ्या किटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्याक्षिक मोर्शी येथे दाखविण्यात आले.

राज्यातील कपाशीचे क्षेत्र 40 लाख हेक्टरपर्यंत आहे. या पिकांवरील बोंडअळीसह विविध प्रकारच्या किड नियंत्रणासाठी किटकनाशके फवारणी करावी लागते. मात्र, सध्या त्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच मजुरांची वानवा आहे. अशास्त्रीय पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेतकरी, शेतमजुरांचा बळी जाण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने यांत्रिकीकरणावर भर दिला असून विशेषत: कपाशी पिकांवरील किटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. स्वयंचलित यंत्राद्वारे 15 मिनिटात एक एकरावर फवारणी केली जाणार आहे. बॅटरीवर चालणारे ड्रोन असून यामध्ये जीपीएस प्रणाली आहे. एकवेळ क्षेत्र मोजमाप केल्यास पुन्हा मोजण्याची गरज नाही. किटकनाशकांचा प्रार्दूभाव किती आहे तेदेखील कळणार आहे. त्यामुळे फवारणी किती करावी, हे देखील निश्चित होणार आहे. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यास यापुढे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, हा उद्देश ड्रोनच्या फवारणीमागे असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या