सोयगावमध्ये पूलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बापलेकीचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला अतीवृष्टीचा फटका बसला आहे. तालुक्यातील सोयगाव परिसरातही आठवडाभरापासून झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाने परिसरातील नदी नाले भरले आहेत. सोयगावच्या पूलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याने वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सोयगाव येथील विलास शालिकराम सहाने (वय 33) आपली सहा वर्षांची मुलगी कल्याणी हिला सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने गावामध्ये किराणा सामान घेण्यासाठी गेले होते. ते कुटुंबासह गावाच्या बाजूला एक किलोमीटरवर शेत वस्तीमध्ये राहतात. विलास गावामध्ये पोहचल्यावर जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने अर्ध्या तासात परिसरातील नद्यानाल्यांचे पाणी वाढले. सामान खरेदी केल्यानंतर पाऊस थांबण्याची वाट बघण्यापेक्षा घरी जाण्याचा विचार विलास यांनी केला. पावसाचा जोर कायम असताना ते मुलीसह मोटारसायकलने शेतातील घराकडे निघाले. सायगाव पूलाजवळ आल्यानंतर पुलावरून पाणी वाहत असल्याचे त्यांना दिसले. पावसाचा जोर वाढत असल्याने पाणी आणखी वाढल्यास आपण अडकून पडू, असे त्यांना वाटले. त्यामुळे मोठ्या हिंमतीने त्यांनी पूल पार करण्याचे ठरवले. अर्धा पूल ओलांडल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांचा तोल गेला आणि गाडीवरून पडून विलास मुलीसह पाण्याच्या प्रवाहासोबत पुलाखालच्या भागात वाहत गेले.

रात्रीचे 9 वाजले तरी विलास आणि मुलगी घरी आली नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी गावामध्ये फोन करून विचारपूस केली असता, विलास मुलीसह गावातून दीड तासापूर्वीच निघाल्याचे समजले. गावकऱ्यांच्या मदतीने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. पुलाजवळ काही अंतरावर विलास यांची मोटरसायकल गावकऱ्यांना दिसली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह पुलापासून दीड किलोमीटरवर आढळला. तर रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोयगावपासून पाच किलोमीटरवर वालसा गावाजवळ झुडपांमध्ये विलास यांचा मृतदेह आढळला. त्यांचे मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी एक वाजता सोयगावमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापलेकीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या