नसरुल्लाला भेटायला पाकिस्तानात गेलेली ‘अंजू’ विक्षिप्त असल्याचा वडिलांचा दावा

अंजू नावाची एक महिला हिंदुस्थानातून पाकिस्तानला गेली आहे. तिची नसरुल्ला नावाचा एक पाकिस्तानी व्यक्तीशी ऑनलाईन ओळख झाली होती. त्याला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात पोहोचली आहे. वैध मार्गांचा वापर करत अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधल्या एका खेडेगावात पोहोचली आहे. तिची आणि नसरुल्लाची फेसबुकवर ओळख झाली होती. अंजूच्या वडिलांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की अंजूचे मानसिक संतुलन ढळलेले असून ती विक्षिप्त आहे. अंजू कोणाच्या प्रेमात पडलेली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

34 वर्षांची अंजू ही उत्तर प्रदेशातील कैलोर गावात जन्मली होती. सध्या अंजू ही राजस्थानातील अलवर जिल्ह्यात राहात होती. 2019 साली तिची आणि 29 वर्षांच्या नसरुल्लाची फेसबुकवर ओळख झाली होती. अंजूने नसरुल्लाला भेटण्यासाठी खैबर पख्तूख्वा भागातील आदिवासी पट्टा असलेल्या अप्पर दीर भागात धडक मारली आहे. अंजूने यासाठी पाकिस्तानचा व्हिसा काढला आहे. आपल्याला अंजू ही पाकिस्तानला गेल्याचे कालपर्यंत कळाले नव्हते असे तिच्या वडिलांनी म्हटले. अंजूच्या लहान भावाने आम्हाला दीदी पाकिस्तानला पोहोचल्याचे सांगितले तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाल्याचे तिच्या वडिलांनी गया प्रसाद थॉमस यांनी सांगितले.

अंजूशी आपल्या जवळपास 20 वर्षांपासून संपर्क नसल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. लग्नानंतर अंजू राजस्तानातील भिवाडी इथे राहायला गेली होती. अंजूचे वडील सध्या मध्य प्रदेशात राहातात. अंजूला दोन मुले असून ती आपल्याला कधीही भेटायला आली नसल्याचे गया प्रसाद यांनी सांगितले. आपला जावई हा स्वभावाने गरीब असून आपली मुलगी मात्र विक्षिप्त असल्याचे गया प्रसाद यांचे म्हणणे आहे. अंजू विक्षिप्त असली तरी ती पाकिस्तानातल्या मित्रासोबत प्रेमसंबंधात असेल असे आपल्याला वाटत नाही असे गया प्रसाद यांनी म्हटले आहे.