
देशात महागाईने कहर केला आहे. त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या किमतीत शेतकरी होरपळून गेला आहे. कृषिप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक अरिष्टात कधीच सापडली नव्हती.
एकीकडे उत्पादनवाढीचा आग्रह धरत असताना दुसऱया बाजूला त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीबाबत सरकारकडून कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांश खताचे दर 1500 रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या अर्थगणितावर झाला आहे.
मशागतीचे दर
मशागत प्रकार पूर्वीचे दर आताचे दर
नांगरणी 1000 रु 1700 रु.
रोटॅव्हेटर 1250 रु. 1900 रु.
मोगडा डबल 900 रु. 1300 रु.
सरी काढणे 600 रु 1000 रु.
बेड काढणे 750 रु. 1100 रु.
























































