
बहुप्रतिक्षीत फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा शंख वाजण्यापूर्वी तब्बल 60 हजार प्रेक्षक क्षमतेच्या अल बायेत स्टेडियमवर जवळपास दोन तास उद्घाटन सोहळा रंगला. कतारमधील संस्कृती दर्शवणाऱया कार्यक्रमाने या सोहळ्याला प्रारंभ झाला. फ्रान्सचा महान फुटबॉलपटू मार्सेल डेसैलीने वर्ल्ड कप ट्रॉफी मैदानावर आणून सोहळ्याला सुरुवात केली.
कतारच्या संस्कृतीची माहिती दिल्यानंतर सर्व संघाचे झेंडे आणि यापूर्वीची स्पर्धेची अँथम साँग्स यांची झलक देखील स्टेडियमवरील उपस्थितीत फुटबॉल चाहत्यांना दाखवण्यात आली. पॉपस्टार शकिराच्या ‘वाका वाका’ या गाण्यावर पुन्हा एकदा अवघे स्टेडियम थिरकले. मात्र, यावेळी शकिराची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर यंदाच्या वर्ल्डकपचा मस्टकॅट लाईबची मोठी प्रतिकृती देखील मैदानावर आणण्यात आली. यानंतर दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध बँड बीटीएस गायक जंग कूक याचा देखील कार्यक्रम झाला. स्पर्धेचा शुंभकर ‘लाईब’ने कोरियन बँडच्या जंगकूकसोबत गायक फहर अल कुबैसी यांचे स्वागत केले. बॉलीवुड अभिनेत्री नोरा फतेहीच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षकांना चांगलेच घायाळ केले. स्पर्धेत सहभागी 32 संघांच्या जर्सी घालून व संबंधीत देशांचे ध्वज घेऊन कलाकारांनी नृत्य केले व उदघाटन सोहळ्याची सांगता झाली. या नयनरम्य शुभारंभी सोहळ्यानंतर यजमान कतार व इक्वाडोर यांच्यातील लढतीने फुटबॉल वर्ल्ड कपचा श्रीगणेशा झाला.
जगभरातील वेगवेगळ्या सेलिब्रिटीजनी विश्वचषक फुटबॉल उदघाटन सोहोळ्याला हजेरी लावली.हॉलिवूड स्टार मॉर्गन फ्रीमन यांच्या एका नाटय़रूपी भाषणाने या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर कतारमधील वेगवेगळ्या प्रकारची अरबी संस्कृतीची झलक या सोहळ्यात बघायला मिळाली.
जगप्रसिद्ध बीटीएस बॅण्डचा जंग कूक ठरला मुख्य आकर्षण
लोकप्रिय दक्षिण कोरियन बँड बीटीएस विश्वचषक फुटबॉल स्पर्धा उदघाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. बीटीएसचा प्रमुख कलाकार जंग कूक याने प्रथमच विश्वचषकाच्या उदघाटन समारंभात उपस्थितांना आणि जगभरात सोहोळ्याचे प्रसारण टीव्ही वर पाहणाऱया फुटबॉल शौकिनांना खुश केले याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीही हिनेही दिलखेचक नृत्य सादर केले. यासोबतच अमेरिकन बँड ब्लॅक आयड पीस, कोलंबियन गायक जे बाल्विन, नायजेरियन गायक पॅट्रिक ननेमेका ओकोरी आणि अमेरिकन रॅपर लिल बेबी यांनी आपल्या कलेने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले.

























































