
वर्ल्ड कपचा किंग असलेल्या ब्राझीलचा जल्लोष सुरू झाला आहे. सर्बियाविरुद्ध सलामीच्या लढतीत त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. रिचार्लीसनच्या डबल धमाक्यामुळे ब्राझीलने सर्बियाविरुद्ध 2-0 अशी मात करीत आपल्या व्रेझी चाहत्यांना सांबा नृत्यासह आपला विजयी जल्लोष साजरा करण्याची संधी दिली. आता त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी सोमवारी स्वित्झर्लंडविरुद्ध विजय नोंदवावा लागणार आहे.
फिफा वर्ल्ड कपचा दावेदार असलेल्या ब्राझीलला तब्बल 62 मिनिटे एकही गोल करता आला नाही. याचे सारे श्रेय खरोखरच सर्बियाला द्यावे लागेल. आपली केवळ तिसरीच वर्ल्ड कप स्पर्धा खेळत असलेल्या सर्बियाने ब्राझीलला अक्षरशः झुंजवले. त्यांचा संघ अनुभवाने कमी असला तरी त्यांनी ब्राझीलच्या एकाही दिग्गजाला गोल करू दिले नाही. मध्यंतरापूर्वी ब्राझीलने अनेकदा सर्बियाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला, पण सर्बियाने त्यांना रोखले.
मध्यंतरानंतर 60 व्या मिनिटाला अॅलेक्स सॅण्ड्रोने मारलेली किक थेट गोलपोस्टच्या बारवर आदळली. तो जवळजवळ गोलच होता. त्या हल्ल्यानंतर ब्राझील थांबला नाही. 62 व्या मिनिटाला ब्राझीलच्या आक्रमकांनी चेंडू गोलपोस्टजवळ नेत नेमारकडे पास केला. नेमारकडून तो विनीसियस ज्युनियरने मारला, पण गोलरक्षक वानिया मिलिनकोवीच-सेविचने तो फटका एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या हातून निसटताच रिचार्लीसनने (हिचार्लीसन) क्षणाचाही विलंब न करता त्याला गोलजाळय़ात मारून ब्राझीलच्या पहिल्या गोलाची नोंद केली. त्यानंतर 73 व्या मिनिटाला विनीसियसचा अचूक पास अडवून रिचार्लीसनने सायकल किक मारून गेलेला गोल अद्भुत होता. या दोन गोलांच्या आघाडीनंतरही सर्बियाने शिस्तीत खेळ केला. त्यांचा खेळही वाखाणण्याजोगा होता, पण त्यांना एकही गोल नोंदवता आला नाही.
नेमारच्या खेळण्याबाबत साशंकता
टाचेला दुखापत असूनही खेळत असलेल्या कर्णधार नेमारला शेवटच्या क्षणी मैदान सोडावेच लागले. त्याच्या पायाला सूज आली असून 24 तासांच्या देखरेखीनंतर दुखापतीबाबत स्पष्ट केले जाणार आहे. प्रथमदर्शनी त्याच्या पायाची सूज पाहता स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. जर नेमारची दुखापत गंभीर असेल तर त्याला सोमवारी विश्रांती देण्याची शक्यता आहे.
फिफा वर्ल्ड कप गुणतालिका
गट ए
संघ सा. वि. ड्रॉ प. गुण
नेदरलॅण्ड्स 1 1 0 0 3
इक्वॉडोर 1 1 0 0 3
सेनेगल 1 0 0 1 0
कतार 1 0 1 1 0
गट बी
इंग्लंड 1 1 0 0 3
इराण 2 1 0 1 3
अमेरिका 1 0 1 0 1
वेल्स 2 0 1 1 1
गट जी
ब्राझील 1 1 0 0 3
स्वित्झर्लंड 1 1 0 0 3
सर्बिया 1 0 1 0 0
पॅमेरून 1 0 1 0 0




























































