अपराजित मोरोक्को, प्रतिस्पर्ध्यांकडून अद्याप शून्य गोलच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोरोक्को उपांत्य फेरीत पोहोचलाय यावर कुणाचा विश्वासच बसत नाहीय; पण त्याचबरोबर या संघाविरुद्ध अद्याप एकही गोल झालेला नाही हे ऐकूनही डोळय़ांवर विश्वास होत नाहीय की, ही कामगिरी मोरोक्कोने केलीय. गेल्या पाच सामन्यांत मोरोक्को अपराजितही आहे.

फिफा वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत क्रोएशिया आणि मोरोक्को. हे दोनच संघ अपराजित आहेत. क्रोएशियाने साखळीत एक विजय आणि दोन सामने अनिर्णित राखत बाद फेरी गाठली होती. त्यानंतर त्यांनी बाद फेरीत जपान आणि ब्राझीलचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये संपुष्टात आणले होते. मोरोक्कोने साखळीत बेल्जियमचा 2-0 आणि कॅनडाचा 2-1 असा पराभव केला होता, तर क्रोएशियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. कॅनडाविरुद्ध झालेला एकमेव गोल हा मोरोक्कन नायफ अगर्डकडून स्वयंगोल झाला होता. त्यानंतर बाद फेरीत स्पेनला 0-0 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवले, तर पोर्तुगालचा 1-0 ने पराभव केला. त्यामुळे ते केवळ अपराजितच नाही, तर त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करता आलेला नाही.

एकाच गटातील दोन संघ उपांत्य फेरीत
एकाच गटातून बाद फेरीत पोहोचलेले मोरोक्को आणि क्रोएशिया हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ‘एफ’ गटातून मोरोक्कोने अव्वल स्थान पटकावत बाद फेरी गाठली होती, तर क्रोएशियानेही अपराजित राहत दुसऱया क्रमांकासह अंतिम सोळा संघांमध्ये स्थान मिळविले होते. हे अपराजित आणि एकाच गटातून खेळलेले दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर एक नवा दुर्मिळ इतिहास रचला जाईल आणि फुटबॉल जगताला नवा जगज्जेताही लाभेल.