
मेघालयातील शिलाँग येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे FIFA U-17 महिला विश्वचषक भारत 2022 साठी लेगसी इनिशिएटिव्ह अंतर्गत प्रशिक्षक शिक्षण शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. याठिकाणी 23 इच्छुक प्रशिक्षक – महिला- ई-परवानाधारक अभ्यासक्रम घेत आहेत. अधिकृत प्रमाणित फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी अभ्यासवर्ग चालवण्यात येत आहेत.
कार्यक्रमाची 11 वी आवृत्ती 4 ते 7 सप्टेंबर 2022 या कालावधीत आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये सहभाग घेतेलेल्यांना सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सहभागी महिलांना नेतृत्वगुण देखील शिकविण्यात येणार आहेत.
याबद्दल मेघालय फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष लार्सिंग सावन म्हणाले, “मेघालय फुटबॉल असोसिएशन आणि त्याच्या संलग्न जिल्हा संघटनांच्या AIFF, AFC आणि FIFA च्या पाठिंब्याने मेघालयात फुटबॉल खेळणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये मध्ये वाढ होत आहे. FIFA U-17 महिला विश्वचषक भारत 2022 लेगसी प्रोग्राम अंतर्गत ई-परवानाधारक अभ्यासक्रमाचे ठिकाण म्हणून मेघालयची निवड झाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्हाला खात्री आहे की फुटबॉलसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना आम्हाला यश मिळेल.
दरम्यान, FIFA U-17 महिला विश्वचषक भारत 2022 च्या स्थानिक आयोजन समितीच्या प्रकल्प संचालकांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे, “हिंदुस्थानातील महिला फुटबॉलच्या वाढीला आणि विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशभरात महिला प्रशिक्षकांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, तळागाळातील महिलांच्या सहभागातून हे साध्य करता येईल. हिंदुस्थानातील महिला फुटबॉलच्या व्यापक प्रगतीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.”





























































