FIFA World Cup 2022 आशियाई संघ ठरला वरचढ, मेस्सीच्या अर्जेंटिनाचा लाजिरवाणा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) आज ‘क’ गटातील अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया हे संघ आमनेसामने आले होते. दोन वेळच्या जगज्जेता आणि यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या अर्जेंटिनाचा सौदी अरेबियाने पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सौदीने अर्जेंटिनाचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला.

जागतिक क्रमवारीमध्ये 51 व्या स्थानावर असणाऱ्या सौदी अरेबियाकडून कोणालाही विजयाची अपेक्षा नव्हती. पण हाच संघ डार्क हॉर्स ठरला असून दोन वेळच्या (1978 आणि 1986) विजेत्या अर्जेंटिनाचा दारूण पराभव केला. सौदीने पिछाडी भरून काढत अर्जेंटिनाला पराभवाची धूळ चारली.

सामन्याच्या सुरुवातीपासून फेव्हरेट असणाऱ्या अर्जेंटिनाना दणक्यात सुरुवात केली. दहाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उठवत मेस्सीने गोल केला आणि अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफपर्यंत अर्जेंटिनाची ही आघाडी कायम होती.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सौदीच्या सालेह अलशेहरी याने गोल करत सामना बरोबरीत आणला. पहिला गोल खाल्ल्यामुळे अर्जेंटिनाच्या गोटात गोंधळ उडाला आणि याचा फायदा उठवत सालेम अलदावसारीने 53 व्या मिनिटाला गोल करत सौदीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अर्जेंटिनानने सौदीच्या गोल पोस्टवर एकामागोमाग एक हल्ले केले. मात्र सौदीचा गोलकिपर मोहम्मद अलोवैसने दमदार खेळ करत अर्जेंटिनाचे हल्ले परतवून लावले.