
आशियातील यजमान कतार, इराण आणि सौदी अरेबियाचे साखळीतच आव्हान संपुष्टात आले असले तरी ऑस्ट्रेलिया, जपानपाठोपाठ दक्षिण कोरियानेही अखेरच्या साखळी सामन्यात पोर्तुगालविरुद्ध 2-1 अशा धक्कादायक विजयाची नोंद करीत फिफा वर्ल्ड कपच्या बाद फेरीत धडक मारण्याची कमाल करून दाखवली, मात्र दक्षिण कोरियाच्या विजयामुळे दोनदा जगज्जेता ठरलेला उरुग्वे जिंकूनही गोलफरकामुळे साखळीतच स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. आता कोरियाला उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी ‘जी’ गटातील विजेत्या (संभवता ब्राझील) संघाशी दोन हात करावे लागणार आहे.
दक्षिण कोरियाने अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या वांग ही-चानने गोल करून सामन्याचा निकालच फिरवला. पोर्तुगालला पाचव्याच मिनिटाला रिकार्डो होर्ताने गोल ठोकून आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल ठोकण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले, पण कोरियाची धडपड वाखाणण्याजोगी होती. जास्तीत जास्त चेंडूला पोर्तुगालचे खेळाडू खेळवत असले तरी कोरियन खेळाडूंनी मिळेल तेव्हा गोल करण्याची भूक दाखवली आणि त्याच्या या भूकेला 27 व्या मिनिटाला यश लाभले. किम यंग वॉनने अप्रतिम गोल करून कोरियाला विजयी आघाडी मिळवून दिली.
उरुग्वेचे स्वप्न भंग
जॉर्जियन दे एरास्कायताने 26 आणि 32 व्या मिनिटाला केलेल्या दोन गोलांच्या जोरावर उरुग्वेने घानाचे बाद फेरीत पोहोचण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले, पण गोलफरकामुळे तेसुद्धा स्पर्धेबाहेर फेकले गेले.


























































