ब्रील एम्बोलोने जन्मभूमीलाच हरवले, स्वित्झर्लंडची कॅमेरूनवर 1-0 अशी मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रील एम्बोलोने कर्मभूमी स्वित्झर्लंडकडून खेळताना जन्मभूमी असलेल्या कॅमेरूनविरुद्ध दणदणीत विजयाची नोंद केली आणि फिफा वर्ल्ड कपच्या ‘जी’ गटात एक जबरदस्त सुरुवात केली. आता स्विस संघाची पुढची लढत ब्राझीलशी पडणार आहे.

कॅमेरूनच्या एरिक चौपो, ब्रायन एम्बुमो आणि मार्टिन होंगला यांनी आपापली सधी गमावून संघाचे खाते उघडले नव्हते, पण दुसऱया हाफमध्ये एम्बोलोच्या गोलने त्यांना हादरवले. त्यानंतर स्विसला दुसऱया गोलचीही संधी होती, पण कॅमेरून गोलरक्षक आंद्रे ओनानाने तो वाचवला, पण तो सामना वाचवू शकला नाही. कॅमेरूनचा हा वर्ल्ड कपमधला सलग आठवा पराभव आहे. आता त्यांना 1990 सालापासून साखळीतच बाद होण्याची परंपरा खंडित करायची असेल तर सर्बियाविरुद्ध विजय मिळवावाच लागेल.

एम्बोलोने जल्लोष टाळला
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आशियाई संघाबरोबर आफ्रिकन संघांनीही दमदार कामगिरी केल्यामुळे कॅमेरूनही स्विस संघाला धक्का देईल असाच अंदाज होता. कॅमेरूनची सुरुवातही तशीच होती. स्विसला कॅमेरून कडवा प्रतिकार देत होता. तरीही पहिल्या हाफमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पण मध्यंतरानंतर तिसऱया मिनिटालाच ब्रील एम्बोलोने केलेला गोल ना तो विसरू शकणार ना, कॅमेरून संघ. सामन्यातला हा गोल केल्यानंतर एम्बोलो भावनिक झाला. त्याने जल्लोषही साजरा केला नाही. कारण कॅमेरून त्यांची जन्मभूमी आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने कॅमेरून सोडून स्वित्झर्लंडला स्थलांतर केले होते. त्याच्याच गोलने आफ्रिकन संघाला पराभूत केले.