मेस्सी, ग्रेट हो !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनात उससे तुमसे मिलाने की कोशीश में लग जाती है… हा डायलॉग काल प्रत्यक्षात खरा ठरला. लिओनल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना जगज्जेता व्हावा,  ही इच्छा केवळ अर्जेंटिनाची नव्हती ना एकटय़ा लिओनल मेस्सीची. ही इच्छा तर होती अवघ्या जगाची अन् फुटबॉलच्या अब्जावधी चाहत्यांची. एकाच वेळी इतकी प्रबळ इच्छा अवघ्या जगाची का असेल? कारण एकच.  अवघं जग मेस्सीवर प्रेम करतं, त्याच्या खेळावर प्रेम करतं. त्याच्या कारकिर्दीचा शेवट गोड व्हावा, हीच सर्वांची इच्छा होती आणि म्हणूनच अवघ्या जगाने मनापासून ती केलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न–प्रार्थना यशस्वी ठरल्या.

मेस्सीने स्वतःसह अर्जेंटिनाचीही स्वप्नपूर्ती केली. या जगज्जेते पदानंतर मेस्सीला ग्रेट पेले आणि मॅराडोनाच्या पंक्तीत विराजमान केले जाईल. त्याच्यावर ग्रेटेस्ट प्लेअर ऑन अर्थचा अभिषेकही केला जाईल. पण काही विचारवंत विरेध करतील. ते होणारच, पण मेस्सी ग्रेट होता आणि आहेच, हे सांगणारे असंख्य असतील. कोटय़वधी असतील.

काल फिफा वर्ल्ड कपची फायनल पाहताना जाणवलं की अवघं जग मेस्सीच्या मागे धावत होतं. जो माणूस गेली 15-20 वर्षे ज्या स्वप्नांसाठी झगडत होता, संघर्ष करत होता, गोलांचा वर्षाव करत होता, विक्रमांचा पाऊस पाडत होता, पुरस्कारांचे मान मिळवत होता, ज्याने आपल्या कारकिर्दीत सर्वकाही मिळवले होते. नव्हतं फक्त जगज्जेते पदाचा मुकुट. त्यामुळे तो नेहमीच महानतेच्या पंक्तीत थोडा मागेच असायचा. म्हणूनच त्याच्या कारकिर्दीला जगज्जेते पदाचा टिळा लागावा, त्याची स्वप्नपूर्ती व्हावी, ही सर्वांची इच्छा होती.

ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आधी 90 मिनिटे, मग 30 मिनिटे आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सारे मेस्सी आणि अर्जेंटिनाबरोबर धावत होते. सामन्याचा थरार प्रत्येकाला सहन होत नव्हता, तरीही ते धावत होते. अवघं जग थांबविणाऱ्या या फायनलमध्ये अब्जावधी चाहत्यांचे मेंदू आणि मन एकाच वेगात धावत होते. केवळ प्रयत्नच नव्हे तर प्रार्थना करायलाही त्यांचे हात जोडले गेले होते. अखेर गोंझालो मॉण्टिएलची ती पेनल्टी यशस्वी हेताच जे घडलं ते अभूतपूर्व होतं. क्लायमॅक्स थरारक होता; पण शेवटी निकाल आपल्या बाजूने लागल्याचा जो आनंद होता तो अविस्मरणीय होता. जेव्हा अवघ्या जगाला वाटतं की आपण जिंकलो, तेव्हा बोलण्यासारखं काही उरतच नाही. मेस्सीने वर्षाचा शेवट सुखद केलाय. लिओनल मेस्सीने दोन दिवसांपूर्वी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. पण ग्रेटेस्ट मेस्सी अजूनही खेळणार आहे. या यशामुळे मेस्सी फुटबॉलच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय. आता जेव्हा जेव्हा पेले-मॅराडोनाचा उल्लेख होईल, तेव्हा तेव्हा मेस्सीही असेलच. आता फुटबॉलच्या अब्जावधी चाहत्यांच्या हृदयावर कायमस्वरूपी कोरलं गेलंय… मेस्सी, तुस्सी भी ग्रेट हो…