
सामना ऑनलाईन । मॉस्को
रशियामध्ये सुरू असलेल्या २१ व्या फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम टप्पा जवळ येत असून शुक्रवारी उप उपांत्यफेरीचे दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात उरुग्वेची लढत १९९८ चा चॅम्पियन फ्रान्सशी, तर दुसरा सामना पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील आणि बेल्झियममध्ये रंगणार आहे.
वर्ल्ड कप आटोपल्यावर ‘खुल्लमखुल्ला’ दारू पार्ट्या बंद
उरुग्वे आणि फ्रान्सने बाद फेरीमध्ये दोन दिग्गज संघाचा पराभव करत उप उपांत्यफेरी गाठली आहे. उरुग्वेने रोनाल्डोच्या पोर्तुलागला तर फ्रान्सने मेस्सीच्या अर्जेंटिनाला लोळवले होते. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असणार आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या बचावफळीची चांगलीच परीक्षा होणार आहे.
उरुग्वे आणि फ्रान्सच्या संघाचा विश्वचषकातील आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे. उरुग्वेने साखळी सामन्यात आणि बाद फेरीमध्ये एकही सामना गमावलेला नाही. सलग चार विजय मिळवून उरुग्वेचा संघ उप उपांत्यफेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे फ्रान्स देखील विश्वचषकात आतापर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाही. परंतु एका सामन्यात त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. गोलच्या बाबतीत उरुग्वेच्या संघाने आतापर्यंत विरोधी संघाविरुद्ध ६ गोल केले आहे तर फक्त एक गोल स्वीकारला आहे. दुसरीकडे फ्रान्सने विरोधी संघाविरुद्ध ७ गोल केले असले तरी ४ गोल खाल्लेही आहेत.
फुटबॉल विश्वचषकाच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उरुग्वेसाठी चिंतेची बाब म्हणजे सुआरेझसोबत मिळून संघाला विजयाची गोडी चाखवणारा स्टार स्ट्रायकर एडिन्सन कवानी दुखापतग्रस्त आहे. पोर्तुगालविरुद्ध दोन विजयी गोल करणारा कवानीला या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे फ्रान्सविरुद्ध तो मैदानात उतरणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. कवानीच्या अनुपस्थितीमध्ये स्ट्रायकर सुआरेझला जास्त परिश्रम करावे लागणार असून मैदानावरील त्याचा गेम थोड्या बिघडण्याची शक्यता आहे. या दोघांनी मिळून संघाला उप उपांत्यफेरीचा रस्ता दाखवला असला तरी फ्रान्सविरुध ही जोडी फुटल्यास याचा परिणाम सामन्याच्या निकालावरही होऊ शकतो.






























































