ईद ए मिलाद सणानिमित्त लाऊडस्पीकर लावण्यावरून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

सामना प्रतिनिधी । नगर

राहुरीत ईद मिलाद उत्सवात लाऊडस्पीकरबंद करण्याची मागणी धुडकावून लावल्याने एकाने दुसर्‍याला लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करत हातावर तसेच छातीवर ब्लेडने वार करून जखमी केले.जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ही जबर मारहाणीची ही घटना घडली. राहुरी तालुक्यात ईद ए मिलादचा उत्सव साजरा होत असताना खाटीक गल्ली येथे झालेल्या हाणामारीच्या या घटनेने सणाला गालबोट लागले आहे. ईद मिलाद सण साजरा करण्यासाठी खाटीक गल्ली येथील तरूणांनी लाऊड स्पिकर लावलेला होता. यावेळी सवेरा बेकरीचा मालक जिया याने लाऊडस्पीकर बंद करण्याचे सांगितल्याने वादाला तोंड फुटले.

यावेळी वसिम रहिमखान पठाण या तरूणाने ईदचा सण असल्याने लाऊडस्पीकर लावलेला असल्याचे सांगितले. या रागातुन सवेरा बेकरीचा मालक जिया याने वसिम रहिमखान पठाण यास लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करत हातावर तसेच छातीवर ब्लेडने वार करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान शहरातील खाटीक गल्ली येथे घडली घटना घडताच या परिसरात नागरीकांची पळपळ झाली.अंगावर ब्लेडचे वार करण्याची घटना प्रथमच घडल्याने खाटीक गल्ली येथे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

अंगावर ब्लेडचे वार झालेला जखमी वसिम रहिमखान पठाण याने दिलेल्या फिर्यादी वरून राहुरी पोलिसांनी सवेरा बेकरीचा मालक जिया याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळ वरून पळुन गेल्याची माहिती पोलीस सुत्राने दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भाबड करीत आहेत.
ईद ए मिलादचा उत्सव साजरा होत असताना खाटीक गल्ली येथे तरूणावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.