
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन पोलिसांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार ऍड. आशीष शेलार आज केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोप केले. या आरोपांना नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. या दोन्ही पत्रकार परिषदांच्या मागोमाग आमदार आशीष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत फटाके फोडले, पण नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले. पण नवाब मलिक यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला दिसत होता. चेहऱयावरचा त्यांचा थाट व मेकअप उतरला होता. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची कबुलीच मलिक यांनी दिली, असा दावा आशीष शेलार यांनी केला.
मुंबईतील खासगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आजसुद्धा सरकार रेडिरेकनरच्या 25 टक्के रक्कम जमा करून घेते. मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली असा सवाल शेलार यांनी केला. हा विषय एवढा सरळ नसून 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि त्यातील दोषी आरोपींना मदत करण्यासाठी 2005 मध्ये हे व्यवहार झाले असल्याने हा विषय गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करून याची चौकशी करावी, अशी मागणी आशीष शेलार यांनी केली.
वानखेडे कुटुंबीयांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी आज संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे व बहीण यास्मीन वानखेडे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. समीर वानखेडे व आमच्या कुटुंबीयांच्या विरोधात खोटे पुरावे देऊन अडकवले जात आहे. या सर्व बाबी आम्ही राज्यपालांकडे मांडल्या. त्यावर धैर्य ठेवा, लढा. सत्याचा विजय होईल असे राज्यपाल म्हणाल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या.





























































