‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी 20 फेब्रुवारीनंतर सुरुवात, सोलापूर जिल्ह्यात 295 शाळांची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील जवळपास नऊ हजार खासगी शाळांमध्ये सव्वा लाख गरीब मुलांना ‘आरटीई’तून मोफत प्रवेश मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 295 खासगी शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली आहे. त्या नामवंत शाळांमध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील दोन हजार 297 मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पुढील आठवडय़ापासून म्हणजेच 20 फेब्रुवारीनंतर ऑनलाइन अर्ज करायला प्रारंभ होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) नामवंत खासगी शाळांमधील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागांवर दरवर्षी गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही शिकण्याची मोफत संधी दिली जाते. शाळांना त्यासाठी नावनोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीकृत शाळांना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबासह विधवा, परितक्त्या महिलांच्या मुलांनाही प्रवेश द्यावाच लागतो.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील 295 शाळांनी यंदा ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली असून, त्यात सोलापूर शहरातील 17 शाळा आहेत. शहरातील त्या शाळांमध्ये 201 मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्या प्रवेशात वशिलेबाजीला थारा नाही. अचूक अर्ज आणि पुरेशी कागदपत्रे असतील, तर निश्चितपणे प्रवेश मिळतोच, अशी मागील वर्षाची स्थिती आहे.

विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज भरण्यासंदर्भातील माहितीसाठी होम पेजकर एक व्हिडियो तसेच मार्गदर्शक सूचना असतात. याशिवाय, अर्ज करताना येणाऱया अडचणींची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्र असणार आहे. प्रवेेश अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर केंद्रप्रमुखांकडे प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे द्यावी लागतात. त्याची पडताळणी होऊन पात्र-अपात्र मुलांची यादी निश्चित केली जाते.