TPL 2022 चौथ्या पर्वाला सुरुवात, ‘हैदराबाद स्ट्रायकर्स’ आघाडीवर तर ‘चेन्नई स्टॅलियन्स’ तळाला

टेनिस प्रीमिअर लीगच्या चौथ्या पर्वाला पुण्यातील बालेवाडी मैदानात रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात झाली. यावेळी शाळेच्या मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. टेनिस रुजवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक ब्लॉकबस्टर सामने पहायला मिळाले. यात हैदराबाद स्ट्रायकर्स संघाने आघाडी घेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

दिल्ली ब्रिगेड आणि पुणे जॅग्वार संघात पहिली लढत झाली. दिल्लीच्या सौजन्याने अंकिता भोसलेविरोधात 12-8 ने सामना जिंकत चांगली सुरुवात केली, मात्र पुरुषांच्या एकेरी लढतीत दिल्लीला पराभव स्वीकारावा लागला. पाठोपाठ पुरुष दुहेरीतही पुण्याने बाजी मारल्याने दिल्लीचा संघ दबावात दिसत होता, परंतु अखेर मिक्स डबल्समध्ये विजय मिळवत दिल्लीने सामना 40-40 असा बरोबरीत आणला. सौजन्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

दुसरा सामना गुजरात पँथर्स आणि मुंबई लिऑन आर्मीत रंगला. गुजरातची स्टार खेळाडू अंकिता रैना हिने मूळची युक्रेनची असणारी खेळाडू Valeriya Strakhova हिचा 13-7 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष एकेरीचा सामना मुंबईच्या रामकुमार रामनाथन याने आपल्या नावे केला. मात्र पुरुष दुहेरीत मुंबईला पराभव सहन करावा लागला. पाठोपाठ मिस्त्र दुहेरीतही मुंबईचा पराभव झाला. त्यामुळे मुंबईचा सहमालक लियंडर पेस थोडा नाराज झाला. अंकिता रैनाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

तिसरा सामना बंगळुरू स्पार्टन्स आणि पंजाब टायगर्समध्ये झाला. पंजाब टायगर्सचा संघ पहिल्यांदाच टीपीएलमध्ये उतरला आहे. बंगळुरूच्या करमन कौर थंडी आणि पंजाबच्या Diana Marcinkevica मधील हा सामना 10-10 असा बरोबरीत संपला. त्यानंतर बंगळुरूच्या सिद्धार्थ रावतने पुरुष एकेरीत पंजाबच्या Denis Istomin याचा 13-7 पराभव केला. पाठोपाठ सिद्धार्थने विष्णू वर्धनच्या साथीने पुरुष दुहेरीतही बंगळुरूला विजय मिळवून दिला. त्यानंतर विष्णू वर्धनने करमन कौर सोबत मिस्त्र दुहेरीत विजय मिळवत पंजाबला आघाडी मिळवून दिली. सिद्धार्थ रावतला सामनावीर पुरस्कार मिळाला.

चौथा सामना चेन्नई स्टॅलियन्स आणि हैदराबाद स्ट्रायकर्समध्ये रंगला. महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीत हैदराबाद स्ट्रायकर्सने विजय मिळवला, मात्र मिस्त्र दुहेरीतील सामना 10-10 बरोबरीत सुटला. निक्की पुनाच्या या हैदराबाच्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळाला.

पहिल्या दिवशी 48 गुणांसह हैदराबादने पहिला क्रमांक पटकावला. त्याखालोखाल 47 गुणांसह बंगळुरू दुसऱ्या आणि 45 गुणांसह गुजरात तिसऱ्या स्थानी राहिला. दिल्ली आणि पुणे 40 गुणांसह चौथ्या आणि पाचव्या, तर मुंबईचा संघ 35 गुणांसह सहाव्या आणि पंजाबचा संघ 33 गुणांसह सातव्या स्थानावर राहिला. तर चेन्नईचा संघ 32 गुणांसह तळाला आहे.