बंगळुरू-हावडा एक्सप्रेसला आग, आंध्र प्रदेशमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; प्रवाशांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमधील चित्तूर येथे रविवारी बर्निंग ट्रेनचा थरार पहायला मिळाला. धावत्या रेल्वेला आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने आग जास्त पसरली नाही आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या (Bangalore-Howrah Express) एसी बोगीमध्ये अचानक आग लागल्याने हडकंप उडाला. आग लागताच प्रवाशांनी आरडा-ओरडा सुरू केला. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सर एम विश्वेश्वरैया टर्मिनल-हावडा दुरंतो एक्सप्रेसमध्ये ही आगीची घटना घडली. ही एक्सप्रेस चित्तूर जिल्ह्यातील कुप्पन रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर एस-9 एसी कोचला आग लागली. आग भडकलेली दिसताच प्रवाशांनी सामानासह गाडीतून बाहेर धाव घेतली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने हानी टळली.

दरम्यान, प्राथमिक तपासाअंती ब्रेक ब्लॉकमध्ये घर्षण झाल्याने आग भडकल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ब्रेक बायडिंग आणि धूरही पाहायला मिळाला.