
विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या भयंकर आगीमुळे आज विरारमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा अक्षरशः आकांत उसळला. या हृदय पिळवटून टाकणाऱया घटनेमुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. 15 बळी घेणाऱया विजय वल्लभ रुग्णालयाचे फायर ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रुग्णालय व्यवस्थापनावर उशिरा 304, 337, 338 कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी महापालिकेचा अग्निशमन विभाग सुस्त का राहिला? अग्निशमन विभागाने किती रुग्णालयांना फायर ऑडिटच्या नोटिसा बजावल्या, किती रुग्णालयांचे फायर ऑडिट केले, हा सवाल आता ऐरणीवर आला असून पालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाचेच ऑडिट करा, अशी संतप्त मागणी वसई–विरारकरांनी केली आहे.
विरार पश्चिम येथील तिरुपतीनगरात विजय वल्लभ हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात एकूण 90 कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात 17 रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास दुसऱया मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणेच्या कॉप्रेसरचा स्फोट झाला आणि वॉर्डात ऑक्सिजन असल्याने क्षणार्धात अख्ख्या आयसीयू विभागात आगीचे भयंकर लोळ पसरले. तेथे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावलेल्या 15 रुग्णांना हालचालच करता आली नाही. काही कळायच्या आतच त्या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांचा पहाटेच फोन; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेप्रकरणी तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री पहाटे स्वतः फोनवरून जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ व अधिकाऱयांशी बोलले. सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवा आणि इतर रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्यावर उपचार सुरू राहतील याकडे जातीने लक्ष द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करा. या रुग्णालयात अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती की नाही याची तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखाची तातडीची मदतही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.
भंडाऱयाची पुनरावृत्ती
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात 9 जानेवारी रोजी नवजात बालक कक्षाला लागलेल्या आगीत 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हादरलेल्या प्रशासनाने राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास चालढकल केल्यानेच पुन्हा एकदा भंडाऱयाची पुनरावृत्ती विरारमध्ये झाली.
आग लागल्यावर स्टाफ रुग्णांना सोडून पळाला
आग लागली तेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ रुग्णांना सोडून बाहेर पळाला. रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. आयसीयूमध्ये केवळ दोन नर्सच होत्या. मात्र त्यांनी बाहेर धाव घेतली, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. परंतु रात्री डय़ुटीवर डॉक्टर होते, असा दावा रुग्णालयाचे सीईओ दिलीप शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तेव्हा दुर्घटनेच्या वेळी एकूण किती स्टाफ डय़ुटीवर होता, असे विचारताच त्यांना आकडा सांगता आला नाही.
आकांत…जनार्दन म्हात्रे यांचे कुटुंब रस्त्यावरच कोलमडून पडले
ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून दिवस पालथा घालून जनार्दन म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी एका रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन म्हात्रे यांना विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवले आणि अवघ्या एका दिवसात त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. आपल्या वडिलांचा होरपळून मृत्यू झाल्याचे कळताच म्हात्रे यांचे कुटुंब रस्त्यावरच कोलमडून पडले. त्यांचा भयंकर आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. कोणी कुणाला सावरायचे हाच प्रश्न प्रत्येकाला पडला होता.
वसईच्या नाळे गावातील जनार्दन म्हात्रे यांची मुलगी नम्रता हिचे शनिवारी 24 एप्रिलला लग्न होते. मात्र दहा दिवसांपूर्वी म्हात्रे यांना कोरोना संसर्ग झाल्याने आणि सरकारने लॉकडाऊन घोषित केल्याने त्यांनी मुलीचा लग्नसोहळा रद्द केला. ते नालासोपाऱयातील अलायन्स रुग्णालयात दाखल झाले. त्यांची ऑक्सिजन लेव्हल घटू लागल्याने आणि अलायन्समध्ये ऑक्सिजन बेड नसल्याने त्यांना दुसऱया रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांनी दिवसभर अक्षरशः पायपीट करून सगळी रुग्णालये पालथी घातली. 21 एप्रिल रोजी रात्री त्यांना विजय वल्लभमध्ये एक आयसीयू बेड मिळाला आणि तेथे ते दाखल झाले. गुरुवारी रात्रीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली, त्यांची ऑक्सिजन लेव्हल 96 पर्यंतही पोहोचली. पण त्याच रात्री मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. घटनास्थळी आलेली त्यांची पत्नी उषा, मुली नमिता, नम्रता आणि मानसी या रस्त्यावरच कोलमडून पडल्या.
आमची आई आज घरी येणार होती हो…डिस्चार्जआधीच क्षमा म्हात्रेंवर काळाचा घाला
आमची आई कोरोनावर मात करून आज घरी येणार होती हो… तिला आज डिस्चार्ज मिळणार होता, आम्ही तिच्या स्वागताची तयारीही केली होती. पण हे काय झालं…. आमची आई आता परत कधीच येणार नाही… कळंब गावातील क्षमा म्हात्रे यांच्या मुलींचा हा आक्रोश… त्यांना सावरायचे कसे, धीर कसा द्यायचा हाच प्रश्न सर्वांना पडला होता. कोरोनाच्या दुसऱया लाटेत क्षमा म्हात्रे या कळंब गावातील पहिल्याच रुग्ण. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या कोरोनामधून बऱयाही झाल्या. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. पण आज त्यांचाही हॉस्पिटलमधल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या मुली जान्हवी आणि प्रियांकाचा आक्रोश सुरू होता.
हंबरडा फोडत कार्तिक सैरावैरा धावत होता
माझे बाबा गेले हो.. आम्ही दोघं एकत्र आलो.. एकत्र दाखल झालो.. धोका नको म्हणून त्यांना आयसीयूत दाखल केले आणि आज माझे बाबा गेले हो… होरपळून, तडफडून गेले, असा टाहो फोडत कार्तिक शिंदे हा तरुण सैरावैरा धावत होता. टिटवाळय़ात राहणारा कार्तिक शिंदे आणि त्याचे वडील नरेंद्र शिंदे हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नाही म्हणून ते विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. वडील नरेंद्र शिंदे यांना आयसीयू वॉर्डात तर कार्तिकला जनरल वॉर्डात दाखल करण्यात आले. रुग्णालयात झालेल्या भयंकर अग्नितांडवात नरेंद्र शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळताच कार्तिक सैरभैर झाला.
पतीच्या मृत्यूनंतर कोरोनाबाधित पत्नीनेही सोडले प्राण
विजय वल्लभ रुग्णालयात वसईतील 100 फूट रोड परिसरातील श्री ट्विंकल स्टार सोसायटीत राहणारे कुमार दोशी (45) हेही आयसीयू विभागात उपचार घेत होते. तर त्यांची कोरोनाबाधित पत्नी चांदणी यांच्यावर विरारच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. आजच्या भयंकर अग्नितांडवात कुमार दोशी यांचा होरपळून मृत्यू झाला. चांदणी यांना पतीच्या निधनाची बातमी कळताच त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमली असून त्या चौकशी समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी थोरात बोलत होते. झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.
दादा भुसे, एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले
पालकमंत्री दादा भुसे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.
पंतप्रधानांची सहवेदना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून सहवेदना व्यक्त केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत जाहीर केली.
रुग्णालयांमध्ये सेफ्टी ऑडिटसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज
राज्यात भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई, विरार घटनांमुळे कोरोनाच्या विरोधातील लढाईत अडचणी येत आहेत. या घटना गंभीर असून अशा घटनांच्या मुळाशी जाताना या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी भविष्यात काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
विरार येथील घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविडची लढाई अशा घटनांनी आणखी कठीण होऊन जाते. संबंधित विभागांनी यासाठी स्वतः पुढाकार घेऊन एका ठरावीक कालावधीत सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, एकीकडे कोविडचे संकट आणि त्यात अशा घटना. त्यामुळे आणखी वाढते आहे.
सर्व रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिक ऑडिट करा!
रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱयांची तातडीने बैठक घेतली. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट करा. त्यासाठी व्हिजिलन्स पथक स्थापन करून खासगी तज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावीत, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, आयुक्त डी. गंगाथरन, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.



























































