धावत्या बसला लागली आग; बस वाहकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशी बचावले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

एस.टी. महामंडळाची राजगुरू नगर ते पैठणला जाणारी बस नगरजवळ आली असता शिल्पा गार्डनजवळ बसच्या इंजिनच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागली. बस वाहकाने प्रसंगावधान दाखवून बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवुन बसमधील अग्नीशमन यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच मनपाच्या अग्नीशामक दलाला कळविण्यात आले. अग्नीशामक दलही तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली.

शनिवारी प्रवाशांनी खच्चून भरलेली राजगुरुनगर येथून निघालेली पैठणला जाणारी बस क्रमांक एम एच 14 बिटी 5145 बस कायनेटिक चौकांमध्ये आली असता गाडीने अचानक पेट घेतला. बाजूने जाणाऱ्या रिक्षा चालकाने बस पेटल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ चालकाने प्रसंगावधान राखत बस रोडच्या बाजूला उभी केली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरू देण्यात आले. तात्काळ याची माहिती चालकाने येथील पोलिसांना दिली व महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला दिली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणली.