खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, सुरक्षा रक्षकाला मारहाण; 2 दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक आणि युट्युबर खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गुरूवारू गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोन कोचिंग चालकांमध्ये वर्चस्व गाजवण्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. यावेळी कोचिंग सेंटरबाहेर 8 ते 10 राऊंड फायर करण्यात आले. यात सुरक्षकांना मारहाण झाली असून एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री पाटण्यातील मुसल्लहपुर हाट परिसरात प्रसिद्ध खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर काही अज्ञातांनी गोळीबार केला. तसेच तेथील सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक रक्षक जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर खान सर यांनी प्रतिक्रिया दिली असून, शेजारच्या कोचिंग सेंटर चालकानेच हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना खान सर म्हणाले, “आम्ही कमी फीमध्ये गरीब मुलांना शिकवतो आणि त्यातून अनेक मुले चांगल्या गुणांनी यशस्वी होतात. याचाच शेजारच्या कोचिंग क्लासेस चालकांना राग आहे आणि याच कारणातून हा गोळीबार व सुरक्षारक्षकाला मारहाण झाली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून आमचे संपूर्ण ऑफिस तोडण्यात आले असून, प्रशासनाने आता आमच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, असे खान सर म्हणाले. तसेच दोन दिवसात कोचिंग क्लास उडवूट टाकू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोपही खान सरांनी केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पाटणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात असून, एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.