प्लास्टिक बंदीनंतर मालवणात पहिली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातल्यानंतर मालवण पालिकेच्यावतीने शहरात राबविलेल्या मोहिमेत एका दुकानावर पहिली कारवाई करण्यात आली. यात थर्माकोलच्या डिश, प्लास्टिक कप, प्लास्टिक पिशव्या यासह १५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर संबंधित व्यापार्‍यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सर्व प्लास्टिक उत्पादक, वितरक, साठवणूकदार, विक्रेते, ग्राहक व नागरिकांना पालिकेच्यावतीने प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्लास्टिक तसेच थर्माकोल २३ जूनपर्यत पालिकेत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याची कार्यवाही न झाल्यास व पाहणीत प्लास्टिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्व नागरिकांनी घेत पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी रंजना गगे यांनी केले होते.

पालिकेच्यावतीने स्वच्छता निरीक्षकांनी बाजारपेठेत पाहणी केली. यात करपूस्वामी यांच्या होलसेल माल विक्री दुकानात पंधरा किलो प्लास्टिक आढळून आले. हे सर्व प्लास्टिक जप्त करत त्याच्यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक जयसिंग गावीत, लिपिक हेमंत कोचरेकर, मुकादम रमेश कोकरे, कर्मचारी भूषण जाधव, सुधाकर कासले यांनी ही कारवाई केली. अन्य दुकानांची पाहणी करण्यात आली यावेळी प्लास्टिक पिशव्या न बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या. आठवडा बाजारास आलेल्या विक्रेते तसेच ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्या बंदीला चांगला प्रतिसाद मिळाला. कापडी पिशव्या तसेच कागद याचा वापर करून साहित्याची खरेदी केली जात होती. पालिकेच्यावतीने सातत्याने पाहणी मोहिम राबविली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.