जिल्ह्यातील पहिल्या मराठा समाजाच्या दाखल्याचे पेण येथे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

गेली अनेक वर्षे आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठमोठी आंदोलने केली. विविध प्रकारचे मोर्चे काढले. एवढेच नव्हे, तर अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या प्राणाची आहुतीही दिली. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेला आणि या सर्व लढाईनंतर मराठा समाजाला ‘इएसबीसी’ या नावाने 16 टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षण देण्याचा घोषणेनंतर राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमधील महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून मराठा समाजाच्या दाखल्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल होऊ लागले. पेण तालुक्यातील सुप्रिया सुभाष शिगवण या द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिने आपली दाखल्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेण तालुक्यातील हबीब खोत यांच्या महा ई सेवा केंद्रामार्फत रायगड जिल्ह्यातील पहिला मराठा समाजाचा दाखला मिळविण्याचा मान प्राप्त झाला.

इएसबीसीचा दाखला मिळेल की नाही याची मला शाश्वती नव्हती, परंतु महा ई सेवा केंद्रातील हबीब खोत यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यानंतर मला आज हा जिल्ह्यातील पहिला मराठा समाजाचा दाखला मिळतोय याबद्दल मला खूप आनंद होत आहे, असे सुप्रिया शिगवण हिने सांगितले. तर मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी सुप्रियाचे अभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनी देखील अशीच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आणि हबीब खोत यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्याला मिळालेल्या 16 टक्के आरक्षणाचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले.

याबाबत हबीब खोत यांना विचारले असता तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा समाजाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या आरक्षणाचा लाभ व्हावा यासाठी मी स्वतःहून शिबीर घ्यायला तयार आहे असे सांगून या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, अव्वल कारकून प्रताप बोराडे, तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसिलदार हडके, डी एच कांबळे आणि महा ई सेवा मधील सर्वांचे आभार मानले.