
सार्वजनिक आणि घरगुती पर्यावरणपूरक बाप्पांची संख्या वाढत असून पहिल्यांदाच लग्नकार्यासह इतर समारंभात वापरण्यात आलेल्या केळीच्या खांबापासून पर्यावरणपूरक बाप्पा साकारण्यात आला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्या कुर्ला येथील घरी दीड दिवसांचा बाप्पा विराजमान झाला होता. मूर्तिकार राजू मयेकर यांनी हा बाप्पा साकारला.
गणेशाची मूर्ती ही टाकाऊ केळीच्या पानाचा गाभा व टिश्यू पेपरच्या साहाय्याने तयार करण्यात आली. मूर्ती तयार करताना केळीच्या खांबाचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करण्यात आली. ते एक रात्र भिजत ठेवले व त्यात पेपर, खडू पावडर व गोंद मिसळून साच्यात ठेवताना मिश्रणाचा एकावर एक थर थापला व जे साचे होते ते कडक ऊन्हात सुकवण्यात आले. दोन दिवसानंतर असे वेगवेगळे भाग बाहेर काढले. तारेच्या साहाय्याने मूर्तीची बांधणी केली. यासाठी पर्यावरणपूरक साहित्य व रंगाचा वापर करण्यात आला. दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची वाटचाल सुरू झाली असून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, यासाठी मीसुद्धा ही केळीच्या खांबापासून साकारलेला मूर्ती खास बनवून घेतली, अशी माहिती दहिबावकर यांनी दिली.




























































