हापूस आला; डझनाचा दर 4500 रुपये

हापूस म्हटलं की देवगडचा पिवळाधम्मक आंबा डोळय़ासमोर उभा राहतो. देवगड तालुक्यातील कातवणचे आंबा बागायतदार प्रशांत शिंदे आणि दिनेश शिंदे यांनी ऐन पावसाळय़ात जिवापाड जपलेल्या हापूस आंब्याची यंदाच्या सिझनची पहिली पेटी वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व ‘मराठी बाणा’चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्याकडे पाठवली आहे.

यंदाच्या आंब्याच्या सिझनमधील या पहिल्या पेटीत दोन डझन आंबे असून प्रतिडझनाला तब्बल 4500 रुपये एवढा दर मिळाला आहे. आंब्याचा सिझन नसतानाही प्रशांत शिंदे यांनी पावसाळय़ात विशेष मेहनत घेऊन आंबा पिकवल्याचे अशोक हांडे यांनी सांगितले. आंब्याच्या झाडाला मोहर आल्यापासून बाजारात जाईपर्यंत तब्बल नऊ महिने या फळाची विशेष निगा राखावी लागते.

आमच्या मेसर्स किसनराव नथुजी हांडे या पेढीवर आलेला पहिला आंबा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केला जातो. गेल्या सात दशकांपासून हाच रिवाज आहे. त्यानुसार यंदाच्या सिझनचा हा पहिला आंबा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केला जाणार असल्याचे हांडे यांनी सांगितले.