
पहिली ते आठवीच्या शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाकडून बालभारतीच्या पाठय़पुस्तकांचे वाटप झालेले नाही. पुस्तकांअभावी धडा समजून घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येत असून अनेक सधन पालकांनी शाळांकडून मिळणाऱया मोफत पाठय़पुस्तकांची वाट न पाहता पाल्याच्या अभ्यासाचे नुकसान टाळण्यासाठी दुकानांतून पाठय़पुस्तके विकत घेतली आहेत. शाळांना पाठय़पुस्तके मिळण्यास उशीर होतो. विव्रेत्यांकडे मात्र सर्व पुस्तके उपलब्ध कशी होतात, असा सवालही काही पालकांनी उपस्थित केला आहे.
पाठय़पुस्तके न मिळाल्याचा मोठा फटका पहिलीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ही पहिलीच पायरी आहे. बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ई बुकमुळे विद्यार्थी कसाबसा अभ्यास करीत असले तरी या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्याची सवय लागली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांची गरज फारशी लागली नाही. कारण शाळा सुरू झाल्यापासून 45 दिवस या विद्यार्थ्यांनी ब्रीज कोर्सद्वारे मागील इयत्तांचा अभ्यास केला. पण आता ब्रीज कोर्सचा कालावधी संपला असून विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांची गरज भासणार आहे. शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या; पण गेल्या वर्षीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी पुस्तके शाळेत जमा न केल्याने अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिले आहेत.
अद्याप पाठय़पुस्तके पोहोचली नाहीत
17 ऑगस्टपर्यंत दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्सद्वारे मागील इयत्तांचा अभ्यास सुरू होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांची गरज भासलेली नाही; पण आता 17 ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास शिकविण्यास सुरुवात झाली असून पुस्तकांअभावी विषय समजविण्यास शिक्षकांना अडचणी येत आहेत.
– संजय डावरे, अध्यक्ष, मुंबई मुख्याध्यापक संघटना
आठवडाभरात पाठय़पुस्तके पोहोचतील
राज्यभरात 85 टक्के पाठय़पुस्तकांचे वाटप झाले आहे. पुस्तके शाळांपर्यंत पोहोचली आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांचे वाटप होण्यास विलंब होऊ शकतो. एका इयत्तेची पाच पाठय़पुस्तके असतील तर त्यातील फक्त दोन विषयांच्याच पुस्तकांचे वाटप झाले नसेल. येत्या आठवडाभरात सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठय़पुस्तके पोहोचतील.
– दत्तात्रय जगताप, संचालक प्राथमिक शिक्षण
ई-शिक्षण आणि ई-बुक आणि विद्यार्थ्यांची कसरत
कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शाळा सुरू आहेत. विद्यार्थी मोबाईल किंवा अन्य डिजिटल माध्यमातून ऑनलाइन वर्गांना हजेरी लावत आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना बालभारतीच्या वेबसाइटवर असलेले किंवा आधीच डाऊनलोड करून ठेवलेले ई-बुक ओपन करण्यास सांगितले जाते; पण विद्यार्थ्यांना एकाचवेळी ऑनलाईन वर्ग सुरू असताना मोबाईलवर किंवा अन्य माध्यमात ई-बुक ओपन करण्यास अडचणी येतात, असे काही पालकांनी सांगितले. अशावेळी शिक्षकांनी वर्गात सांगितलेला धडा वर्ग संपल्यानंतर ई-बुकमध्ये पाहावा लागत असल्याचेही पालकांनी सांगितले.





























































