
गुजरात, केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यातील मच्छिमार नौका कोकण किनारपट्टीतमध्ये घुसखोरी करत आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात परराज्यातील मच्छिमार नौका त्यांचा माल उतरवत आहेत आणि त्यामुळे स्थानिक मच्छिमारांशी स्पर्धा होत आहे. गुजरातसारख्या अन्य राज्यातील बंदरात बाहेरुन येणार्या मच्छिमार नौकांना प्रवेश दिला जात नाही. रत्नागिरीमध्ये घुसखोरी करणार्या या परप्रांतीय नौकांमुळे भविष्यात मच्छिमारांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सरकारने परराज्यातील या मच्छिमार नौकांना महाराष्ट्रातील बंदरात प्रवेश देऊ नये याकरीता आम्ही स्थानिक मच्छिमार समुद्रात आंदोलन करू, असे रत्नागिरी जिल्हा पर्ससीन मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष विकास सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरी जिल्हा पर्ससीन मच्छिमार संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज पत्रकार परिषदेत परराज्यातील मच्छिमारांच्या घुसखोरी बद्दल माहिती दिली. अध्यक्ष विकास सावंत म्हणाले की, परराज्यातील मच्छिमार नौका त्यांचे मासे रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरात उतरवतात आणि आम्हा स्थानिक मच्छिमारांना मिळणारा भाव निम्म्यावर आणतात. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. गुजरातसारख्या राज्यामध्ये बाहेरील मच्छिमारांना बंदी केलेली आहे. महाराष्ट्रातही अशी बंदी झाली पाहीजे अशी आमची महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे, असे सावंत यांनी सांगितले. मच्छिमार नेते नासीर वाघू म्हणाले की मच्छिमार गेल्या वर्षापासून आर्थिक संकटात आहे. परराज्यातील मच्छिमारांनी घुसखोरी सुरु केल्यामुळे मच्छिमारांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशावेळी परराज्यातील मच्छिमारांना रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग बंदरांमध्ये प्रवेश देऊ नये. तसेच महाराष्ट्राच्या हददीत येऊन मासेमारी करणार्या परराज्यातील नौकांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मच्छिमार जावेद होडेकर यांनी पर्ससीन मच्छिमारांना दिलेली चार महिन्यांची मुदत वाढवून आठ महिन्यांची करावी अशी मागणी केली. प्रतिक मोंडकर यांनी परराज्यातून येणार्या मच्छिमार नौकांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली़. यावेळी संघटनेचे सचिव विजय खेडेकर उपस्थित होते.





























































