200 कप कॉफीएवढं कॅफिन घेतलं, फिटनेस ट्रेनर तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅफिन पावडरच्या अतिरेकी सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जवळपास 200 कप कॉफीत आढळेल इतक्या जास्त प्रमाणात कॅफिनचं सेवन केल्याने तरुणाचा जीव गेला आहे.

या तरुणाचं नाव थॉमस मॅन्सफिल्ड असं असून तो ब्रिटनच्या वेल्स या देशाचा रहिवासी होता. तो व्यवसायाने फिटनेस ट्रेनर होता. त्याने 5 जानेवारी 2021 रोजी सप्लिमेंट ड्रिंक बनवण्यासाठी कॅफिन पावडर खरेदी केली. पण, आपल्या ड्रिंकमध्ये त्याने निर्धारित मात्रेहून सात पटीने जास्त कॅफिन पावडर टाकली आणि तो ते ड्रिंक प्यायला.

ड्रिंक प्यायल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने छाती पकडली आणि तो खाली कोसळला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. ही घटना घरातच घडल्याने थॉमसची पत्नी तिथेच होती. तिने त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण, तिथे थॉमसला मृत घोषित करण्यात आलं.

थॉमसच्या शवविच्छेदनात त्याच्या रक्तात 392 मिलिग्रॅम कॅफिन पावडर आढळली. इतक्या जास्त प्रमाणातील कॅफिन हे 200 कप कॉफीइतकं आहे. रक्तात 78 मिलीग्रॅमहून अधिक प्रमाणात कॅफिन मिसळल्यास माणसाचा मृत्यू होश शकतो. वास्तविक कॅफिन सेवन करणाऱ्यांना दिवसातून दोन वेळा एकूण 60 ते 300 मिलीग्रॅम इतकं कॅफिन सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण, थॉमसने तब्बल 5 ग्रॅम इतक्या प्रचंड प्रमाणात कॅफिन सेवन केलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला.