होतकरू अभिनेत्रीचे नग्न व्हिडीओ पॉर्नसाईटला विकले, कोलकात्यातून 5 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका होतकरू अभिनेत्रीचे नग्न व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आले होते. याबाबत अभिनेत्रीने कोलकाता पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी हे व्हिडीओ चित्रीत करणाऱ्या आणि अपलोड करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. बुधवारी या सगळ्यांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर व्हिडीओ चित्रीत करणे आणि महिलेच्या परवानगीशिवाय पॉर्नसाईटला विकल्याचा आरोप आहे. शुभांजन रॉय, मिल्टन घोष, अभिजीत बसाक, देबज्योती सरकार आणि उमेशचंद्रनाथ अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष बाब ही आहे की या आरोपींना दुसऱ्या एका महिलेचे नग्न व्हिडीओ चित्रीत करत असताना अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्रीने बिधाननगर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉर्नसाईटशी संपर्क साधून हे व्हिडीओ डिलीट करायला लावले. या अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलं होतं की काही महिन्यांपूर्वी एका वेबसिरीजच्या नावाखाली तिचे नग्न व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. या व्हिडीओसाठी शुभांजन रॉयने महिलेशी संपर्क साधला होता. त्याने आपण निर्माता असल्याचे भासवले होते. एका वेबसिरीजसाठी चित्रीकरण करायचं असल्याचं सांगून महिलेला न्यू टाऊन हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. तिथे पोहोचल्यानंतर तिच्याशी गोडगोड बोलून नग्न व्हिडीओ चित्रीत करून घेतले होते. हे व्हिडीओ चित्रीत करताना तुझा चेहरा दिसणारच नाही असं आरोपींनी या महिलेला सांगितलं होतं, मात्र पॉर्न साईटवरील व्हिडीओ जेव्हा तिला मोबाईलवर पाठवण्यात आले तेव्हा ती हादरली होती.

हे व्हिडीओ Xvideo नावाच्या पॉर्नसाईटवर अपलोड करण्यात आले होते, ही पॉर्नसाईट जगातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या 10 पॉर्नसाईटपैकी एक आहे. पोलिसांनी या साईटशी ईमेलद्वारे संपर्क साधला होता. व्हिडीओ डिलीट करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर बारीक लक्ष ठेवलं होतं. दुसऱ्या महिलेचे नग्न व्हिडीओ चित्रीत करण्याच्या तयारीत असता या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलं.