अटकेच्या भीतीने निरीक्षकासह पाच पोलीस गायब, सोलापुरात सीआयडीची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरात पुण्याचे सीआयडी पथक दाखल होताच, गुन्हा दाखल असलेले पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस अटकेच्या भीतीने गायब झाले आहेत. पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याचा ठपका या पोलीस अधिकारी व कर्मचाऱयावर ठेवण्यात आला असून, याप्रकरणाची चौकशी साआयडी विभाग करीत आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुह्यात आरोपीला अटक करून कोठडीत ठेवल्यानंतर त्याला जबर मारहाण केल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेचा तपास सीआयडीकडे होता. तपास करून सोलापूर विभागातील सीआयडीचे उपअधीक्षक श्रीशैल गजा यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह पाच कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे पथक सोलापुरात आले असता, गुन्हा दाखल असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आजार व इतर कारण सांगून गायब झाले आहेत. त्यांचे मोबाईलही बंद असल्याने या घटनेची सोलापूर पोलीस आयुक्तालय परिसरात चर्चा रंगली होती.