‘जी-20’साठी मुंबईचा मेकअप, पालिकेची 16.50 कोटींची उधळपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत ‘जी-20’ परिषद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मोठमोठय़ा पडद्यांनी रस्त्यालगतच्या झोपडपट्टय़ा झाकण्यात आल्या आहेत. तर रस्त्यांचीही तात्पुरती डागडुजी करण्यात आली असून रंगरंगोटी-सौंदर्यीकरणासाठी तब्बल 16.50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च म्हणजे मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून करण्यात येत आहे.

‘जी-20’ परिषदेचे अध्यक्ष पद या वर्षी हिंदुस्थानला मिळाले आहे.  या परिषदेच्या  बैठका देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होत असल्याने पालिकेकडून शहराच्या तात्पुरत्या सौंदर्यीकरणाची कामे करण्यात आली आहेत. या परिषदेच्या निमित्ताने उद्योग विश्वातील परदेशी पाहुणे मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देणार असल्याने पालिकेकडून महत्त्वाच्या ठिकाणांचे तात्पुरते सौंदर्यीकरण, स्वच्छता, रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत. यात 80 ते 85 टक्के कामे पालिकेच्या अखत्यारीतील, तरी 10 ते 15 टक्क्यांचा खर्च इतर प्राधिकरणांच्या रंगरंगोटीसाठीही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी लावलेल्या भल्यामोठय़ा जाहिराती, पडद्यांमुळे वाहनांचे अपघात, दुर्घटना होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पालिकेकडून आकस्मिकता निधीमधून या कामांसाठी 11 वॉर्ड आणि उद्यान विभाग मिळून 16.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

पालिका म्हणते…

पालिकेकडे राखीव असलेल्या आकस्मिकता निधीमधून भांडवली अर्थसंकल्पीय लेखाशीर्षका अंतर्गत 11 वॉर्ड आणि उद्यान विभागाला हा निधी आगाऊ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला.

महापालिकेच्या 2002-03च्या परिपत्रकानुसार राज्य/केंद्र सरकारच्या विशेष उपक्रमांसाठी तातडीचा खर्च म्हणून हा निधी वापरता येतो.

निधीच्या निकडीची गरज ओळखून नियमानुसार ‘स्पॉट निविदा’सारख्या नियमित कार्यपद्धतीने खर्च केल्यानंतर कालांतराने खर्चाला कार्योत्तर मंजुरी घेण्यात येते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा झाला खर्च

पालिकेकडून ‘ए’ विभाग पर्ह्ट ते मुंबईचे टोक आर/उत्तर दहिसरपर्यंत, उद्यान विभागासाठी हा खर्च करण्यात आला आहे. यात एम/पश्चिम 2.50 कोटी, एच/पूर्व 2.50 कोटी आणि पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, आर/मध्य, आर/उत्तर व जी/दक्षिण विभागासाठी प्रत्येकी 1 कोटीचा खर्च करण्यात आला आहे. तर ए विभाग 2 कोटी, सी विभाग 75 लाख, डी विभागात 75 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तर उद्यान विभागाकडून 2 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार!

‘जी-20’ परिषदेच्या नावाखाली ‘स्पॉट’ निविदा काढून कोटय़वधीची कामे करण्यात आली आहेत. ही कंत्राटे मर्जीतल्या कंत्राटदारांना देण्यात आल्याचा संशय असून या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते – काँग्रेसचे रवी राजा यांनी केला आहे. शिवाय केवळ दिखाव्यासाठी मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचेही ते म्हणाले.

वास्तव लपवण्याची गरज काय

‘जी-20’ परिषद उद्योगांना प्रोत्साहन देणारी असल्याने पालिकेने  झोपडय़ा झाकून वास्तव लपवण्याची गरज काय, असा प्रश्न माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात आलेले उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात पळवणार आणि परदेशी उद्योजकांसमोर खोटे प्रदर्शन करणार हा प्रकार चुकीचा आहे, असेही त्या म्हणाल्या.