
महापालिका निवडणुकीच्या इतिहासात यंदा प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीने होत असलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच ओबीसी आरक्षण वगळून एकूण 92 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यापैकी 50 टक्के म्हणजेच 46 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धत झाल्याने त्यानुसारच आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण 31 प्रभागात अ, ब आणि क असे उपप्रभाग करण्यात आले. 39 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांना संधी मिळाली आहे. अनुसूचित जातीच्या 12 पैकी 6 जागा या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा, तर सर्वसाधारण महिलांसाठी 40 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 39 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. या आरक्षण सोडतीचा 1 जून रोजी प्रारूप आराखडा प्रसिद्ध होणार असून, 6 जूनपर्यंत त्यावर महापालिकेच्या ताराबाई पार्कमधील मुख्य निवडणूक कार्यालयात हरकती आणि सूचना देता येणार आहेत.
आरक्षण काढताना सुरुवातीस अनुसूचित जाती महिला प्रवर्गापासून सोडत काढण्यात आली. 12 पैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 7 अ, 4 अ, 9 अ, 13 अ, 28 अ आणि 30 अ असे प्रभाग सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. तर 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ, 1 अ आणि 18 अ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले. प्रभाग क्रमांक 2अ याठिकाणी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वसाधारण महिलांसाठी थेट 31 जागांवर आरक्षण निश्चित करण्यात आले. सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उर्वरित 9 जागा सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आल्या. तर उर्वरित 39 जागांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. आयुक्त कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड आदींनी सोडतसाठी काम पाहिले.


























































