भाजप-मिंधे गटाला हादरा, अद्वय हिरे शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अद्वय हिरे हे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शुक्रवारी, 27 जानेवारी रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईत शिवसेना भवन येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. यामुळे मालेगाव, नांदगावसह जिल्ह्यातील भाजप आणि मिंधे गटाला हादरा बसला आहे.

भाजप नेते अद्वय हिरे हे जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष आहेत. ते माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू आणि माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र आहेत. राजकीय, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे. काही दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या समवेत भेट घेऊन चर्चा केली, स्वाभिमानाने राजकीय वाटचाल सुरू राहावी यासाठी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, असे अद्वय हिरे यांनी सांगितले.