दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिला दीक्षित यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते राजकुमार चौहान यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेते राजकुमार चौहान नाराज होते. उत्तर पश्चिम दिल्लीमधून काँग्रेसने चौहान यांच्या ऐवजी राजेश लिलोठिया यांना मैदानात उतरवले होते. तिकीट कापले गेल्याने चौहान यांच्या समर्थकांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घराबाहेर प्रदर्शन केले होते.

अदला-बदली सुरुच
याआधी भाजप नेते आणि विद्यमान खासदार उदित राज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर पश्चिम दिल्लीमधून 2014 रोजी त्यांनी विजय मिळवला होता. परंतु यंदा त्यांच्या ऐवजी भाजपने गायक हंस राज हंस यांना तिकीट दिल्याने ते नाराज होते आणि याचमुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.