अरुण जेटली सरकारी बंगला सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या आजारपणाचा सामना करत असलेले माजी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली हे सरकारी बंगल्यातील वास्तव्य सोडणार आहेत. बंगल्याबरोबरच सरकारी वाहनेदेखील त्यांनी परत केली आहेत. ते लवकरच दक्षिण दिल्लीतील स्वत:च्या घरी वास्तव्याला जाणार आहेत.

मागील लोकसभेचा कार्यकाल संपल्यानंतर एका महिन्यातच खासदारांनी ते राहत असलेल्या सरकारी बंगल्याचा ताबा सोडणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंधनकारक आहे. जेटली यांनी याच निर्देशाचे पालन करत सरकारी बंगल्यातून बाहेर पडून स्वत:च्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्यादेखील त्यांनी कमी केली आहे. त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना पाणी, वीज आणि टेलिफोनची थकीत देयके भरण्याच्या सूचना केल्या आहेत. आजारपणातून सावरल्यानंतर ते छोट्या सरकारी निवासस्थानासाठी विनंती करणार आहेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा सरकारमध्ये रुजू होण्याची जेटली यांना आशा आहे.