गोव्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या तीन आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गोवा

काँग्रेसमधून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या 10 आमदारांपैकी तीन आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

काँग्रेसमधून 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे अल्पमतातील भाजप सरकार बहुमतात आले. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मित्रपक्षातील आमदारांना मंत्रिपदाचे राजीनामा देण्याचे आदेशही दिले होते.

सावंत यांनी पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पद सांभाळल्यानंता त्यांनी मंत्रिमंडळात दुसर्‍यांदा बदल केले.  अधिसूचनेनुसार उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, जलसंसाधन मंत्री विनोद पालेकर, ग्रामविकास मंत्री जयेश साळगांवकर व महसूल मंत्री रोहन खुंटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

गोव्यात काँग्रेसचे 15 आमदार होते. त्यापैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्यात काँग्रेसची अवस्था ढासळली असून त्यांच्याकडे केवळ 5 आमदार शिल्लक राहिले आहेत. तसेच प्रमुख विरोधी पक्षासाठीही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही.