औशात चोरट्यांचा धुमाकूळ, चार दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

शहरात सोमवारी रात्री ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान शहरातील मेन रोडवरील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. तीन ज्वेलर्स व एका किराणा दुकानाचा त्यात समावेश आहे. दुकानांचे शटर वाकवून किराणा दुकानातील रोख २७ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना घडली.

शहरातील बसस्थानकासमोरील अंबिका किराणा दुकान फोडून गल्ल्यातील २७ हजार ५०० रुपये लंपास केल्याची फिर्याद औसा पोलीस ठाण्यात वैभव अनिल गाजरे यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन औसा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी मेन रोडवरील गुरुकृपा ज्वेलर्स, व्यंकटेश ज्वेलर्स, ओमसाई ज्वेलर्स या तिन्ही ठिकाणी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. परंतु सराफाच्या दुकानात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही, असे सांगण्यात आले. पोलीसांची गस्त एकीकडे आणि चोरी दुसरीकडे झाली असल्याने पोलीसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा लहान मोठ्या चोऱ्या सतत होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.